

वेळे : सुरुर, ता. वाई येथे कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात कारचालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्निल जगन्नाथ शिवापकर (रा. खर्शी, ता. जावली) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. तर लक्ष्मण नारायण जगताप (वय 38, रा. वहागाव ता. वाई)असे ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा हायवेवर गुरुवार दि. 9 एप्रिल रोजी रात्री हा अपघात झाला. महामार्गावरील सुरुर गावाजवळ साई पार्क हॉटेलसमोर कारचालक स्वप्नील शिवापकर याने रस्ता क्रॉस करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना धडक दिली. या धडकेत लक्ष्मण जगताप यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा हायवेवरील बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास भुईंज पोलिस ठाण्याचे पोनि पृथ्वीराज ताटे व राजाराम माने करत आहेत.