

पाचगणी : पाचगणी ते महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील भोसे (ता. महाबळेश्वर) येथील सर्व्हे नंबर २६ मध्ये झालेल्या अनधिकृत उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. निवृत्त पोलिस अधिकारी इसाक बागवान यांच्या नावाशी संबंधित जमिनीवर नियमांचे उल्लंघन करून केलेल्या उत्खननाप्रकरणी २० लाख ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भोसे परिसरातील डोंगराळ भागात झालेल्या उत्खननामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून उत्खननाची व्याप्ती आणि स्वरूप तपासण्यास सुरुवात केली होती.
या प्रकरणात शेतीपूरक व्यवसायासाठी परवानगी घेतल्याचा दावा केला जात असला, तरी संबंधित जागा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने तेथे उत्खननास परवानगी नसल्याचे तहसीलदार सचिन मस्के यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे नेमकी कोणत्या स्वरूपाची परवानगी घेतली होती आणि प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचे काम झाले, याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. बागवान यांच्या नावाशी संबंधित या प्रकरणामुळे पाचगणीच्या पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला .
या प्रकरणाची व्याप्ती आणि प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार मस्के यांनी घटनास्थळी पुन्हा भेट देत पाहणी केली. यावेळी प्रत्यक्ष उत्खनन झालेल्या जागेची फुटपट्टीच्या मदतीनेे मोजमापे केली. उत्खननाची लांबी, रुंदी आणि खोली तपासून नव्याने पंचनामा झाला.