Satara News: ‘भारत माता की जय’ने सातारा नगरी दुमदुमली

ना. शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज रॅली उत्साहात
Satara News: ‘भारत माता की जय’ने सातारा नगरी दुमदुमली
Published on
Updated on

सातारा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा.., घर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी राजवाडा ते पोवई नाका अशी भव्य तिरंगा ध्वज दुचाकी रॅली अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाली. ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणांनी सातारा शहर दुमदुमून गेले.

राजवाडा, गांधी मैदान येथून या भव्य दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. गोलबाग येथे ना. शिवेंद्रराजे यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि रॅली पोवई नाक्याकडे मार्गस्त झाली. रॅलीत ना. शिवेंद्रराजे यांच्यासह अनेक मान्यवर, सर्व आजी-माजी पदाधिकारी, सर्व आजी-माजी नगरसेवक, असंख्य कार्यकर्ते आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’चा जयघोष करत रॅली मोती चौकातून पोवई नाक्यावर आली. शिवतीर्थ पोवई नाका येथे ना. शिवेंद्रराजे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर रॅलीची सांगता झाली.

देशाप्रती आपले प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अबालवृद्धांपासून युवक, युवती, माता- भगिनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्या. देशप्रेम वृद्धिंगत करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल ना. शिवेंद्रराजे यांनी सर्वांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news