

कराड : सन 2019 पासून सन 2021 पर्यतच्या तीन वर्षाच्या कालावधीत बेलवडे बुद्रूक (ता. कराड) येथील एका ट्रॅक्टर मालकास तीन वेगवेगळ्या ऊस तोडणी मुकादमांनी सुमारे 6 लाख 67 हजारांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कराड शहर पोलिस ठाण्यातील या गुन्ह्यातील संशयित सोलापूर जिल्ह्यातील असून वारंवार पैशाची मागणी करूनही पैसे न देता विश्वासघात केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी भास्करराव रामचंद्र मोहिते (रा. बेलवडे बुद्रूक, ता. कराड, सातारा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्रविण विक्रम काळे (रा. माळेगाव, ता. माढा), अशोक शिवाजी देवकाते (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) आणि राजकुमार पिंक्या पवार (बोरगाव, ता. माळशिरस) अशी संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रविण काळे याने सन 2019 -2020 च्या हंगामात 1 लाख 74 हजार रुपये घेतले होते. त्यापैकी कामातून 77 हजारांची परतफेड करण्यात आली आहे. मात्र उर्वरित 97 हजार रुपये न देता काळे निघून गेल्यचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच हंगामात अशोक शिवाजी देवकाते यानी 12 लाख 20 हजार रुपये घेत ऊस तोडणी मजूर पुरविले होते.
मात्र 7 लाख 45 हजारांची परतफेड करत उर्वरित 4 लाख 75 हजार रुपये न देताच देवकाते निघून गेल्याचे मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर सन 2021 -2022 च्या हंगामात राजकुमार पवार याने 3 लाख 35 हजारापैकी 2 लाख 15 हजारांची परतफेड केली असून उर्वरित 1 लाख 15 हजार रुपये दिलेले नाहीत असे मोहिते यांनी पोलिसांना सांगितले आहे.