

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (बाटू) अनागोंदी कारभाराचा फटका बी. टेक.च्या हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राची परीक्षा होऊन चार महिने उलटले तरी अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. धक्कादायक म्हणजे, निकाल जाहीर न करताच विद्यापीठाने दुसर्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालये ‘बाटू’शी संलग्न आहेत. विद्यापीठाच्या नियमांनुसार, परीक्षा संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. बी. टेक. प्रथम वर्षाची पहिली सत्र परीक्षा फेब्रुवारी महिन्यात संपली होती. मात्र, चार महिने उलटूनही निकालाबाबत कोणतीही अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. याउलट, विद्यापीठाने 30 जूनपासून दुसर्या सत्राच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या सत्रात किती विषय उत्तीर्ण झाले, हेच माहीत नसल्याने दुसर्या सत्राचा अभ्यास कसा करायचा, या विवंचनेत विद्यार्थी आहेत.
या अनिश्चिततेमुळे विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. वाढत्या स्पर्धेत ’ऑल क्लिअर’ राहण्याचे दडपण आणि विद्यापीठाचा बेजबाबदारपणा यामुळे एखादी अघटित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल पालक आणि विद्यार्थी विचारत आहेत. विद्यापीठाच्या या गलथान कारभारावर तातडीने कारवाई करून निकाल जाहीर करावेत आणि दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा दि.29 जून रोजी संपणार आहेत, त्यानंतर एकही दिवसाचा खंड न ठेवता लगेच लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. प्रथम सत्रात ज्या विद्यार्थ्यांचे विषय ‘बॅकलॉग’ला राहतील, त्यांना याची माहिती कधी मिळणार? त्या विषयांची पुन्हा तयारी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ कधी मिळणार, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून होत आहे. पहिल्या सत्रात सर्व विषयात पास न झाल्यास दुसर्या सत्रात ऑल क्लिअर असूनही त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ईअर डाऊनचा धोका संभवत आहे.