

सातारा : सातारा शहर व परिसरातील रिक्षाचालकांकडून दिवसा व रात्रीच्यावेळी प्रवाशाकडून मनमानी पध्दतीने भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. शहर वाहतूक पोलिस व आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. मनमानीपध्दतीने भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांना नाहक भुर्दंड बसत आहे.
सातारा शहर व परिसरात सिटी बस नसल्याने मोठ्या प्रमाणात रिक्षा वाहतूक होत असते. शहर व परिसरातील नागरिकांना रिक्षाशिवाय पर्याय नसल्याने रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सध्या सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बसस्थानक, राजवाडा, पोवईनाका, बॉम्बे रेस्टाॅरंट, वाढे चौक, कमानी हौद, अजंठा चौक, शिवराज चौक, एमआयडीसी परिसर, रेल्वे स्टेशन यासह विविध ठिकाणी रिक्षांचे थांबे आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते.
मात्र शहर व परिसरातील रिक्षाचालक प्रवाशाकडून मनमानी पध्दतीने भाडे आकारणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. एसटी स्टॅड, रेल्वे स्टेशन, व हायवे परिसरात मीटरप्रमाणे भाडे आकारण्याऐवजी प्रवाशांच्या गरजेचा फायदा घेत अवाजवी भाडे मागितले जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. काही चालक मीटरने जाण्यास नकार देत आहेत. तर काही जण ठराविक अंतरासाठी मनमानी दर सांगतात. जादा भाड्यावरून प्रवाशी व चालकांमध्ये वादावादीचे प्रसंगही निर्माण होत आहेत.
रिक्षाचालकांकडून होणारी मनमानी थांबवण्यासाठी आरटीओ व शहर वाहतूक पोलिस यांनी नियमीतपणे रिक्षांची तपासणी मोहीम सुरू करावी. मीटरप्रमाणे भाडे आकारले जाते की नाही? परवाना व कागदपत्रे तसेच नियमांचे पालन होते की नाही? याची तपासणी करून दोषी रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. रिक्षामध्ये मिटर बसवण्याची व्यवस्था असली तरी प्रत्यक्षात त्याचा वापर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेकदा रिक्षाचालक मिटरचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे अधिकृत भाडे किती आणि रिक्षाचालक किती भाड्याची रक्कम आकारतो याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मीटर असूनही जे रिक्षाचालक वापर करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
पहाटेच्यावेळी प्रवाशांची अडवणूक...
सातारा शहर परिसरात रात्री व पहाटेच्यावेळी रिक्षाचालक प्रवाशांची मनमानीपध्दतीने भाडे आकारणी करून प्रवाशांची अडवणूक करताना दिसत आहेत. बॉम्बे रेस्टाॅरंटपासून शाहूनगरपर्यंत ४०० ते ५०० रुपये तर बॉम्बे रेस्टाॅरंट ते बसस्थानक २०० ते ३०० रुपये, हायवे ते राजवाडा ३०० रुपये असे मनमानी पध्दतीने भाडे सांगितले जात आहे त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. त्यामुळे आरटीओ व शहर वाहतूक पोलिसांनी रात्रीच्यावेळी अचानक मोहीम राबवून रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.