

सातारा : लोकांना एटीएम मशीनमधून पैसे काढायला मदत करून त्यांना मूळ एटीएम कार्ड न देता दुसरे एटीएम कार्ड देऊन फसवणूक करणार्याला पोलिसांनी सातार्यात अटक केली. हिमांशू इंद्रराज सिंग (रा. रखा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्रात वृद्ध नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करुन त्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. मदत करताना एटीएमचा पिन क्रमांक लक्षात ठेवून ज्येष्ठ नागरिकांना मूळ एटीएम कार्ड न देता दुसरे कार्ड द्यायचे. नंतर त्या मूळ एटीएम कार्डवरुन पैसे काढायचे किंवा महागड्या वस्तू खरेदी करायच्या, असे उद्योग होत आहेत. याबाबत एका संशयित आरोपीची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला (एलसीबी) मिळाली.
सातारा एलसीबी पोलिसांनी पथक तयार करुन स्टॅन्ड परिसरात सापळा लावला. संशयित हा सातार्यात एका दुकानात लॅपटॉप घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला पकडल्यानंतर त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने पुणे येथे महिलेला एटीएममधून पैसे काढून देण्याचा बहाणा करुन फसवणूक केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयिताला पकडून पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विश्वास शिंगाडे, पोलिस अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, स्वप्नील दौंड, दलजीत जगदाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.