Satara Assembly Constituencies : जिल्ह्यात आमदारसंख्या जाणार १२ वर

कराड की फलटण आणखी एक लोकसभा मतदार संघ? : चार महिला आमदार
Elections
ElectionsPudhari News Network
Published on: 
Updated on: 

सातारा : देशासह राज्यातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर होणार असून लोकप्रतिनिधींची संख्या १.५ पट वाढवण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या सूत्रानुसार सातारा जिल्ह्यातील आमदारांची संख्या सध्याच्या ८ वरून थेट १२ वर पोहोचणार आहे. तसेच २००९ मध्ये इतिहासजमा झालेल्या कराड लोकसभा मतदारसंघाचे पुनर्जिवन होणार की फलटण हा आणखी एक लोकसभा मतदार संघ अस्‍तित्‍वात येणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व राज्यांतील जागांमध्ये १.५ पट वाढ करण्याच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये आंतरराज्यीय प्रतिनिधीत्वाचा समतोल राखण्यासाठी १९७१ च्या जनगणनेनुसार राज्यांचे प्रमाण २०५१ पर्यंत स्थिर ठेवण्यात येणार आहे, तर राज्यांतर्गत मतदारसंघाची फेररचना २०११ च्या जनगणनेच्या आधारे केली जाणार आहे. नारी शक्ती वंदना अधिनियमानुसार महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी जनगणनेची वाट न पाहता ही पुनर्रचना केली जात आहे. २०२९ च्या विधानसभा व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत परिसीमन आयोगाची स्थापना करून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

२००२ च्या परिसीमन आयोगानुसार २००८ मध्ये झालेली पुनर्रचना २००१ च्या जनगणनेवर आधारित होती. त्यावेळी जागांची एकूण संख्या स्थिर ठेवून केवळ सीमा बदलल्या होत्या. ज्यामध्ये कराड लोकसभा मतदारसंघ विसर्जित होऊन त्याचा भाग सातारा आणि सांगलीत विभागला गेला. आता मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात जागांची संख्याच दीड पटीने वाढवली जाणार आहे.

सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाख ५९ हजार इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात फलटण, वाई, कोरेगाव, माण, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा असे ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. १.५ पट सुत्रानुसार जिल्ह्यात ४ नवीन मतदारसंघाची भर पडून आमदारांची एकूण संख्या १२ होईल. ३३ टक्के महिला आरक्षणानुसार या १२ पैकी किमान ४ विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी राखीव असतील.

लोकसभेचा विचार करता, सध्या जिल्ह्याचा मुख्य भाग सातारा लोकसभेत असून फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत. उत्तर कोरेगावमधील काही गावेही या मतदारसंघात समाविष्ट केली आहेत. जागा दीड पटीने वाढल्यास राज्याच्या एकूण ४८ जागा वाढून ७२ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत लोकसंख्येच्या निकषानुसार कराड हा लोकसभा मतदारसंघ पुन्हा अस्तित्वात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे किंवा सातार्‍याबरोबर फलटण हा आणखी एक लोकसभा मतदार संघ निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे.

नवीन मतदारसंघांच्या निर्मितीमुळे जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांची मक्तेदारी मोडीत निघून दुसर्‍या फळीतील नेत्यांना आणि महिलांना मोठी संधी या निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे बालेकिल्ले विभागले जाणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांना नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. एकंदरीत मतदारसंघाची ही आगामी पुनर्रचना सातारा जिल्ह्याच्या राजकीय नकाशाचा चेहरामोहरा बदलणारी ठरणार आहे. मतदारसंघ पुनर्रचनेतून जिल्ह्याच्या सत्ताकारणाची नवी मांडणी होणार आहे. आयोगाच्या नकाशावर कोण सुरक्षित आणि कोणाचा पत्ता कट होणार याची प्रचंड उत्सुकता ताणली आहे. पुर्रचनेचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच तालुक्यातील कार्यकर्ते आणि नेते दोघेही कामाला लागले आहेत. १२ आमदार, संभाव्य २ किंवा ३ खासदार आणि ४ महिला आमदारांच्या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

हे नवे विधानभा मतदारसंघ होऊ शकतात?

भौगोलिक विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता जिल्ह्यातील ११ तालुक्यांना स्वतंत्र प्रतिनिधीत्व मिळू शकते. सध्या कोरेगाव आणि माण विधानसभा मतदारसंघाला जोडलेला खटाव तालुका स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होऊ शकतो. वाई मतदारसंघातून महाबळेश्वर व व जावळी हा डोंगरी मतदारसंघ वेगळा होण्याची शक्यता आहे. तसेच खंडाळा तालुक्याचा स्वतंत्र विचार होऊ शकतो. वाढत्या शहरीकरणामुळे सातारा शहर व ग्रामीण किंवा कराड परिसरात एका नव्या मतदारसंघाची निर्मिती होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.