

सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी आणि सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी करण्यात येत असून, विविध उपाययोजना अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दि. 26 ते 29 जून या कालावधीत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्यामुळे, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून पालखी तळावरील जमिनीची स्वच्छता, सपाटीकरण आणि मुरुमीकरण करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. पालखी विसावा घेणार असलेल्या ठिकाणी वारकर्यांसाठी उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे. पालखी तळावरील स्वच्छतागृहांची व्यवस्था, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती आणि नियमित सफाई यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच, वारकर्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी तात्पुरती स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही.
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारले जात आहेत. या कक्षांच्या माध्यमातून वारकर्यांना आवश्यक माहिती आणि मदत पुरवली जाईल. पालखी तळावर आकर्षक मंडप डेकोरेशन, विद्युत रोषणाई, स्वागत कमानी आणि लाईट टॉवर उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. यामुळे पालखी मार्गावर आणि विसाव्याच्या ठिकाणी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. पालखी तळावरील गटार-नाले सफाई करून जंतूनाशकांची फवारणी करण्यात येणार आहे, जेणेकरून आरोग्याच्या दृष्टीने कोणताही धोका उद्भवणार नाही.
गावागावांतील स्वच्छता विषयक सोयी, सुविधा आणि इतर अनुषंगिक कामांना प्राधान्य दिले जात आहे. पालखी सोहळ्याच्या मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, आरोग्य सुविधा आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट्स उभारले जाणार आहेत. यामुळे महिला वारकर्यांपासून ते इतर सर्व भाविकांना आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध होतील. पालखी मुक्काम, विसावा आणि पालखी मार्ग रस्त्यांच्या सफाईसाठी 100 कामगारांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. हे कामगार अहोरात्र स्वच्छतेची काळजी घेतील.
पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने तात्पुरत्या सुविधा उभारण्यात येत आहेत. पाणी व स्वच्छता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालखी मार्गावर ठिकठिकाणी 710 पुरुष व 612 महिलांसाठी अशी एकूण 1 हजार 322 स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत. यासोबतच, 56 पुरुष व 56 महिलांसाठी असे एकूण 112 तात्पुरते मूत्रालय (मुतार्या) आणि 1 हजार 800 तात्पुरती शौचालये उभारली जाणार आहेत. या व्यापक व्यवस्थेमुळे वारकर्यांना स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. एकूणच, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन वारकर्यांच्या सेवेत कोणतीही कसर ठेवणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि. 26 जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत असल्याने, जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. आळंदी संस्थान व अन्य वारकर्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोयी-सुविधा पुरवण्यात येणार आहेत. तसेच सर्व विभागांना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सूचना देण्यात आल्या आहेत.
याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा