सातारा: पुढारी वृत्तसेवा संगम माहुली, ता. सातारा येथील युवा नेते संतोष भाऊ जाधव यांच्यावर मंगळवारी रात्री दोघांनी कोयत्या सारख्या शस्त्राने वार केले. यामध्ये ते व त्यांची पत्नी जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पानपट्टी टपरी टाकायच्या कारणातून वाद झाल्याने त्याची माफी मागायला गेल्यानंतर संशयितांनी हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.
हर्षद संभाजी साळुंखे व जयदीप सचिन धनावडे (दोघे रा. क्षेत्र माहुली ता. सातारा) यांच्या विरुद्ध संतोष जाधव यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, संतोष जाधव यांची दोघेजण पूर्वीच्या वादातून माफी मागायला म्हणून संतोष जाधव यांच्याकडे गेले. ते बेसावध असतानाच संशयितांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जखम झाली. संतोष जाधव यांच्या पत्नी यांनाही संशयितांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याही जखमी झाल्या. यानंतर परिसरातील नागरिकांनी जाधव यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची व पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्यात पहाटे गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा :