Satara agriculture crisis: शेतात कॅनॉल तरीही पिके करपली!

आरफळ कालवा कोरडा; मसूरमधील शेतकरी संतप्त
Satara agriculture crisis: शेतात कॅनॉल तरीही पिके करपली!
Published on
Updated on

मसूर : तीव्र उन्हाळा आणि पाण्याच्या टंचाईमुळे मसूरसह परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. आरफळ कालव्यात वेळेवर पाणी न सोडल्याने उसासह अनेक पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. नियोजित रोटेशन कोलमडल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

अनेक दिवसांपासून कालव्यात पाण्याचा थेंब नसल्याने कालवा पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यावर अवलंबून असलेल्या विहिरींचे जलस्तरही झपाट्याने घसरले आहेत. अनेक विहिरी कोरड्या पडल्याने गावागावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वरच्या टोकावर अनियमित व अनधिकृत पाणीउचल होत असल्याने शेवटच्या टोकावरील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. उसासारख्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना निर्णायक टप्प्यावर पाणी न मिळाल्यास संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

सांगली जिल्ह्यासाठी पाणी वळवताना स्थानिक शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्यात आल्या; मात्र स्थानिकांना पाणी देण्याची वेळ आली असता विविध कारणे देत पुरवठा ठप्प ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण रोटेशन वाया गेले असून मसूर परिसराला सर्वाधिक फटका बसला आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आरफळ कालव्याला तात्काळ पाणी सोडण्याची, रोटेशन काटेकोरपणे राबवण्याची आणि अनधिकृत पाणीउचल थांबवण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नियोजनाचा अभाव...

जेव्हा पाणी होते तेव्हा नियोजन नव्हते; आज गरज असताना पाण्याचा थेंबही नाही. मागील काही महिन्यात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना साठवण व शिस्तबद्ध वापराचे नियोजन झाले नाही. आज मात्र पिके करपत असताना कालवा कोरडा पडल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news