Satara infant death case: अर्भक मृत्यूप्रकरणी नॉनस्टॉप चौकशी

जिल्हा शल्य चिकित्सकांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांवर समितीचा भडिमार
infant death case
infant death caseOnline Pudhari
Published on
Updated on

सातारा : सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. शनिवारी याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी व काही कर्मचारी यांची नॉनस्टॉप चौकशी करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोग्य सचिव व आरोग्य संचालक यांनी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत नॉनस्टॉप चौकशी करत प्रश्नांचा भडिमार केला. समिती याबाबतचा अहवाल कोल्हापूर खंडपीठाला सादर करणार आहे.

दरम्यान, याबाबत गुरुवार. दि. 2 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात सुनावणी होणार असून, त्याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. विजापूर (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. मुलगी अल्पवयीन व अविवाहित असल्यामुळे सुरुवातीला गर्भपातास कायदेशीर कारणास्तव नकार देण्यात आला. नंतर नातेवाईकांनी मेडिकल बोर्डात दाद मागितली. त्यानुसार बोर्डाने प्रसूतीला परवानगी दिली. गर्भाचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा अधिक असल्याने गर्भपाताऐवजी प्रसूती करण्याचा निर्णय देण्यात आला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांनी ही प्रसूती केली.

मात्र, अकाली प्रसूती झाल्याने अर्भकाचे वजन केवळ 750 ग्रॅम होते. प्रसूतीनंतर योग्य ती काळजी न घेतल्याचा आरोप संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी केला. बाळाला 12 तास उपाशी ठेवण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. याप्रकरणी नातेवाईकांच्या वतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात महिला व बालविकास विभागामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. याची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाच्या या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती त्यांनी नेमली. यात सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव-2 चे इ. रावेंद्रन, आरोग्य सेवा मुंबई संचालक डॉ. नितीन आंबेडकर व अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा अधिकारी अशा त्रिसदस्य समितीने चौकशी केली.

शनिवारी ही समिती जिल्हा रुग्णालयात येणार असल्याचे कळताच अनेकांचे धाबे दणाणले. ही समिती 2 वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. समितीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांच्यासह संबंधित मुलगी रुग्णालयात दाखल झाली, तेव्हापासून तिला घरी सोडेपर्यंत ड्युटीवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. दुपारी दोन वाजता सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. यात अनेक जणांची कसून चौकशी केली आहे.

चौकशी दरम्यान प्रत्येकाचे मोबाईल बंद ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची त्रिसदस्य समितीने सखोल चौकशी केली असून, त्याचा अहवाल गुरुवार, दि. 2 एप्रिल रोजी कोल्हापूर खंडपीठात होणाऱ्या सुनावणीवेळी सादर केला जाणार आहे. त्यामुळे अहवाल नक्की काय आहे हे सुनावणीवेळी समोर येणार आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना कॉल केला असता, त्यांचा फोन बंद होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news