

भुईंज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्याजवळ बुधवारी सकाळी मुंबईकडे माल घेवून निघालेल्या मालट्रकला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणातच ट्रकने पेट घेतला. अचानक घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
संबंधित मालट्रक हा मुंबईकडे निघाला होता. आनेवाडी टोलनाका परिसरात हा ट्रक आला असता अचानक ट्रकला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच सातारा व वाई नगरपरिषदांचे अग्निशामक दल तसेच किसनवीर सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. एनएचआय हेल्पलाइन पथकानेही मदतकार्य केले.
या घटनेत नुकसान झाले तरी कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, महामार्गावर वाहनधारकांकडून नियमित टोल वसूल केला जात असतानाही आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. महामार्ग प्राधिकरणाने किमान जीवित व वाहनांचे संरक्षण करण्यासाठी तरी स्वतंत्र अग्निशमन गाडी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.