

मेढा : जावली तालुक्यात जिल्हा बँकेच्या ठरावांवरून राजकीय वातावरण तापले आहे. आलेवाडी येथील सोसायटीच्या ठरावावेळी बुधवारी मोठा संघर्ष झाला. ना. शिवेंद्रराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी ठराव आपल्या बाजूने व्हावा, यासाठी मोर्चेबांधणी केली होती. गावात यात्रेचे स्वरूप निर्माण होईल इतक्या मोठ्या संख्येने दोन्ही गटांचे कार्यकर्ते व गाड्या दाखल झाल्याने परिसरात तणाव होता.
शिवेंद्रराजेंचे समर्थक आलेवाडीचे सरपंच मंगेश पवार हे जे शिंदे समर्थकांच्या सांगण्यावरून काही संचालक अज्ञातस्थळी गेले होते त्यांच्यामध्ये तू-तू मैं-मैं झाली. या वादात सपोनि सुधीर पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला. सकाळी दहा वाजता सोसायटीची बैठक सुरू होण्यापूर्वीच दोन्ही गटांनी सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवून रणनीती आखली होती. शिंदे समर्थकांकडे सदस्यसंख्या अधिक असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, अखेरच्या क्षणी चित्र पालटले.
आलेवाडीचे राजेंद्र भिलारे आणि विजय पवार यांनी शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ७ सदस्यांच्या पाठबळावर भिलारे यांचा ठराव मंजूर करून घेतला. विजय पवार यांनी निर्णायक भूमिका बजावत दोन सदस्य शिवेंद्रराजे गटाकडे वळवल्याने समीकरण बदलले. यामुळे शिवेंद्रराजे समर्थकांनी ठरावावर झेंडा फडकवला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.
ठरावांसाठी स्वत: ना. शिवेंद्रराजे मैदानात
जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः ना. शिवेंद्रराजे भोसले मैदानात उतरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या ठरावातून स्पष्ट होत आहे. स्वतः शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ठरावासाठी हजर होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे या घडामोडींमुळे तालुक्यातील आगामी ठराव आणि जिल्हा बँक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.