सातारा : लाच प्रकरणात वडूज तहसीलदार सहआरोपी

बाई मानेंसह तिघांवर गुन्हा; 1 वर्षापूर्वी सहायकाने घेतली होती लाच
bribery case
लाच प्रकरण file photo
Published on
Updated on

सातारा : वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहायक प्रवीण नांगरे याच्यावर 55 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी सुमारे 1 वर्षापूर्वी गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये अधिक तपासाअंती विद्यमान तहसीलदार बाई माने यांच्यासह आणखी 3 तलाठ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मूळ गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करून बाई माने व तलाठ्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

वडूज तहसीलदार बाई सर्जेराव माने, वडूज तहसीलमधील महसूल सहायक रवींद्र आनंदा कांबळे, औंध तलाठी धनंजय तडवळेकर, भोसरे तलाठी गणेश मोहन राजमाने अशी नव्याने गुन्ह्यात सहआरोपी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सातारा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांचे 2 डंपर वडूज महसूल विभागाने पकडले होते. संबंधित दोन्ही डंपर सोडवण्यासाठी नांगरे याने 55 हजार रुपयांच्या लाचेची मागणी दि. 21 नोव्हेंबर 2023 रोजी केली. ही रक्कम दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. 22 नोव्हेंबर रोजी नांगरे याने तक्रारदार यांना त्याच्या ब्रीझा कारमध्ये ठेवण्यास सांगितली. यावरुन सातारा एसीबीने सापळा रचून कारवाई करत प्रवीण नांगरे याला अटक केली.

सातारा एसीबीने ही कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास पुणे एसीबी कार्यालयाच्या अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे- खराडे यांनी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळत गेली व त्यानुसार या प्रकरणात नांगरे याच्याप्रमाणेच तहसीलदार बाई माने व 3 तलाठयांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन मूळ दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करुन नांगरे याच्याप्रमाणे आणखी चार जणांची नावे सहआरोपी म्हणून घेण्यात आली.

तात्पुरता अटकपूर्व मिळाला; 4 रोजी सुनावणी...

वडूज लाच प्रकरणात सहआरोपी केले जाणार असल्याची कुणकुण तहसीलदार यांच्यासह इतर तिघांना झाली. त्यानुसार अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी वडूज न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर सुनावणी झाली असता न्यायाधीशांनी चौघांना तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news