

भुईंज : भुईंज कारखाना ते भुईंज मार्गावरील उतारावर बुधवारी रात्री ९.१५ च्या सुमारास ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. सागर बाळू लोंढे (वय २६, रा. विजयनगर, भुईंज) असे मृत युवकाचे नाव आहे. अपघातानंतर संबंधित ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाला असून भुईंज पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सागर लोंढे हा बुधवारी रात्री दुचाकीवरून कारखान्याकडून भुईंजच्या दिशेने येत होता. कारखाना ते भुईंज रस्त्यावरील उतारावर त्याच्या दुचाकीला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. या धडकेत सागर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रॅक्टरचालकाचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा. त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मृत युवकाच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.