

सातारा : गेले 9 दिवस साताऱ्याजवळ अपघातांची मालिका सुरू आहे. गुरुवारी ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. हा अपघात एवढा भीषण होता की कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता. सारिका दीपक सुतार (वय 25, रा. संगममाहुली, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या ठिकाणी ट्रक चुकीचा पार्किंग केला होता तर त्याचवेळी एक कार रिव्हर्स येत होती. यातून हा विचित्र अपघात झाला आहे. दरम्यान, अपघात सलग होत असताना उपाययोजना शून्य असल्याने बळींचा आकडा वाढत आहे.
सारिका सुतार या दुचाकीवरुन बॉम्बे रेस्टॉरंट येथून अजंठा चौकाकडे सेवा रस्त्यावरून निघाल्या होत्या. तर ट्रॅक्टर अजंठा चौकाकडून बॉम्बे रेस्टॉरंटकडे निघाला होता. ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या होत्या. ट्रॅक्टर व दुचाकी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आल्या. या ठिकाणी एक ट्रक चुकीच्या ठिकाणी पार्कींग केला होता. तेथेच एक कार देखील रिव्हर्स घेतली जात होती. यातूनच ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला व महिलेच्या डोक्यावरुन ट्रॅक्टर गेला.
अपघातानंतर महिला जोरात किंचाळली व बचावाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणात होत्याचे नव्हते झाले. परिसरात रक्ताचा सडा पडला. वाहतूकही ठप्प झाली. या दुर्घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. महिलेच्या कुटुंबियांनी घटनास्थळी व सिव्हीलमध्ये धाव घेतली. महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.