

दहिवडी : सातारा-पंढरपूर रस्त्यावर माण तालुक्यातील लोधवडेजवळील पवार वस्तीनजीक मंगळवारी रात्री भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पळशी येथील दोघा चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. भाच्याचा वाढदिवस साजरा करून परत येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेने पळशीसह परिसरात शोककळा पसरली.
सुनील छगन देवकुळे आणि अभिनंदन विलास देवकुळे (दोघेही रा. पळशी, ता. माण) असे या भावांची नावे आहेत. दरम्यान, अपघातानंतर कार पलटी झाली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुनील देवकुळे व अभिनंदन देवकुळे हे दोघेही त्यांचा भाचा संस्कार याच्या वाढदिवसानिमित्त गोंदवले येथे गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर नातेवाईकांसह जेवण करुन ते परत गावाकडे निघाले होते. दुचाकीवरुन पळशीला जात असताना रात्री सव्वा नऊच्या सुमारास लोधवडे जवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने (एमएच46 एएल7057) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीवरुन रस्त्यावर फेकले गेले. दोघांच्याही डोक्याला जोराचा मार बसून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामध्ये या भावांचा जागीच मृत्यू झाला.
सुनील देवकुळे हे ऊसतोड मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तर अभिनंदन देवकुळे हे घरातील जनावरे सांभाळून कुटुंबाला हातभार लावत होते. कष्टाने दिवस काढणाऱ्या या दोन तरुणांचे अकाली निधन गावासाठी मोठी पोकळी निर्माण करुन गेले आहे. अपघाताची माहिती मिळताच दहिवडीचे सपोनि दत्तात्रय दराडे आणि पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपास पोलिस उपनिरीक्षक मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नवीन कार घेऊन घरी जातानाच दुर्घटना...
दुचाकीला ठोकर दिलेली कार एक दिवस अगोदरच खरेदी केली होती. मुंबई येथील खारघर येथून कार खरेदी करून दोघे जण आपल्या घरी पिंपरीकडे निघाले होते. मात्र, वाटेतच हा अपघात झाला. घटनेनंतर कारमधील दोघांनीही कार तेथेच सोडून पळ काढला. पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे.