

फलटण : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात सुरवडी (ता. फलटण) येथील कमिन्स कंपनीतील तीन कामगार जागीच ठार झाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या नाल्याच्या कठड्यावर आदळून उलटल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेब्रम (रा. जमशेदपूर, झारखंड) आणि सदानंद पुर्ती (रा. जमशेदपूर, झारखंड) अशी अपघातात ठार झालेेल्यांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ रोजी काम आटोपल्यानंतर संबंधित कामगार वाठार निंबाळकर येथील वसतिगृहात आले होते.
त्यानंतर रात्री सर्वजण कार (एमएच १६ एटी १७५६) मधून फलटण-लोणंद पालखी महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. जेवणानंतर ताथवडे घाट परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. परत येत असताना सुरुवातीला नयम लोंगानी हे वाहन चालवत होते. त्यानंतर मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश) यांनी वाहन चालवण्याची इच्छा व्यक्त केल्याने वाहनाचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला. पुसेगाव-फलटण मार्गावरील वाठार निंबाळकर हद्दीत आल्यानंतर एका वळणावर भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन नाल्याच्या कठड्यावर जोरात आदळली आणि उलटली. या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ फलटण येथील रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच मोहम्मद हुसेन, अनिल हेब्रम आणि सदानंद पुर्ती यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात नयन लोंगानी, सौरभ कुमार (झारखंड) आणि एम. डी. सितारे (बिहार) हे गंभीर जखमी झाले असून, सौरभ कुमार यांना पुढील उपचारासाठी बारामती येथे, तर एम. डी. सितारे यांच्यावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फलटण ग्रामीणचे पोलिस पुढील तपास करत आहेत.