Satara Accident News | गोरेगाव-वांगी रस्त्यावर टेम्पो पलटी
पुसेसावळी : सातारा-सांगली मार्गावरील पुसेसावळी ते गोरेगाव-वांगी दरम्यान रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पुसेसावळी ते गोरेगाव-वांगी रस्त्यावर खडड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावरुन मालवाहतूक करणारा टेम्पो (क्र.एम.एच.09 क्यू 3914) निघाला होता. रस्त्यावरील खड्डे चुकवताना टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे अधिकच घातक ठरत आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांविषयी दैनिक ‘पुढारी’ने यापूर्वी आवाज उठवला होता. त्यानंतर या रस्त्यावर काही ठिकाणी मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र ही उपाययोजना अपुरी आणि अल्पकालीन ठरली. परिणामी, वाहनधारकांचा त्रास कायम राहिला आहे.
रस्त्याची दुरवस्था आणि अपघातामुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. प्रशासन केवळ अपघाताच्या व प्रवाशांचा जीव जाण्याच्या प्रतीक्षेत आहे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रत्येक पावसाळ्यात रस्ता उखडतो, खड्ड्यांमुळे अपघात होतात. मात्र दुरुस्तीची कामे केवळ मलमपट्टीपुरती मर्यादित राहत आहेत. या अपघाताची गांभीर्याने दखल घेत संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सदरचे काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

