Satara Accident: मामाच्या गावाला जाताना सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला

दोघींचा जागीच मृत्यू; भाऊ गंभीर जखमी
Satara Accident
Satara Accident: मामाच्या गावाला जाताना सख्ख्या बहिणींवर काळाचा घालाPudhari
Published on
Updated on

साखरवाडी : मामाच्या गावाला जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या दोन बहिणींवर काळाने घाला घातला. निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला लहान भाऊ गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरूमसह पंचक्रोशीत शोककळा पसरली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (१५) आणि त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (१२) हे बारामती तालुक्यातील मुर्टी या मामाच्या गावाला जाण्यासाठी स्कुटीवरून निघाले होते. नीरा-मोरगाव या राज्य मार्गावर चौधरवाडी फाट्याजवळ त्यांची स्कुटी आणि टेम्पो (क्र. डीडी ०१ जी ९३४३) यांच्यात समोरासमोर धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की, स्कुटीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरफटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढली. या अपघातात सेजल व अक्षरा या बहिणींचा जागेवरच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री उशिरा पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवले.

याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर वडगाव निंबाळकर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news