Satara Accident : पाडळी-हेळगावच्या शिवारात पोलिस प्रशिक्षणार्थींची ट्रॅव्हल्स पलटी; १५ जण जखमी

पहाटे अडीचच्या सुमारास भीषण अपघात; जखमीमध्ये १२ पोलिसांचा समावेश
Satara Accident : पाडळी-हेळगावच्या शिवारात पोलिस प्रशिक्षणार्थींची ट्रॅव्हल्स पलटी; १५ जण जखमी
Published on: 
Updated on: 

मसूर : कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या पोलिस प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हल्सला पाडळी-हेळगावच्या शिवारात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडेला पलटी झाली. या दुर्घटनेत १२ पोलिस प्रशिक्षणार्थींसह चालक, सहचालक आणि क्लिनर असे एकूण १५ जण जखमी झाले. गुरुवारी (दि. ६) पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

उसाच्या दरवाढीसाठी नागठाणे येथे शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे येथील २६ पोलिस प्रशिक्षणार्थींना घेऊन वैभव व राम टुर्स अँड ट्रॅव्हल्सची एमएच ०९ जीई ९०४५ क्रमांकाची बस कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली होती. कराड-रहिमतपूर मार्गावर पाडळी (हेळगाव) येथील खडकी नावाच्या शिवारात शरद जाधव यांच्या शेताजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याकडील खड्ड्याचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली.

या अपघातात सुजीत बाळासो कदम, शिवम उत्तम निकम, रुशिकेश दत्तात्रय पाटील, दशरथ धोंडीराम यमकर, विनेश भगवान वायदंडे, पार्थ सुनील चौगुले, आकाश सुरेश घाडगे, तुषार पांडुरंग बर्गे, शुभम वसंत कुंभार, दिगंबर रंगराव चरापले, सागर सत्ताप्पा खामकर आणि शुभम रामचंद्र कोळी हे १२ पोलिस प्रशिक्षणार्थी जखमी झाले. तसेच ट्रॅव्हल्स चालक समाधान लक्ष्मण पाटील, सहचालक मुकुंदा रामलाल आणि क्लिनर गौरीशंकर सुभाष चौधरी यांनाही गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे रहिमतपूर - कराड या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्‍कळीत झाली होती.

चालकाविरोधात गुन्हा...

या अपघातप्रकरणी धुळे येथे पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असलेले अभिषेक शहाजी पाटील (वय २८, मूळ रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) यांनी मसूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चालक समाधान लक्ष्मण पाटील (रा. नंदाळे बु., ता. व जि. धुळे) याने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालविल्याने अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात आणि पोलिस उपनिरीक्षक एस. एस. भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास व्ही. बी. पोतेकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.