Satara Accident: पोलिस अधिकाऱ्याच्या कारची दोन दुचाकींना धडक

कराड-पाटण मार्गावरील बेलदरे फाटा परिसरात भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चितळी येथील राजेंद्र जोती लोहार हे ठार झाले
Accident
Accident
Published on
Updated on

कराड : कराड-पाटण मार्गावरील बेलदरे फाटा परिसरात भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चितळी (ता. खटाव) येथील राजेंद्र जोती लोहार (वय ५८) हे ठार झाले. शनिवार दि. 6 रोजी सकाळी हा अपघात घडला. अपघातात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या आणखी दोन दुचाकींसह कारचेही नुकसान झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र लोहार हे त्यांच्या ताब्यातील एमएच-११-सीयू-८९९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून कराडहून पाटणकडे जात होते. सकाळी सुमारे दहाच्या सुमारास बेलदरे फाटा परिसरात मागून येणाऱ्या एमएच-५०-ए-६८२२ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की लोहार गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात लोहार यांच्या दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-५०-व्ही-२४८८ आणि एमएच-५०-ई-७४७१ क्रमांकाच्या दुचाकींचेही नुकसान झाले. तसेच संबंधित कारचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कारचालक प्रदीप सूर्यवंशी (पूर्ण नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून ते पोलिस खात्यात नोकरीस आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास कराड तालुका पोलिसांकडून सुरू आहे.

logo
Pudhari News
pudhari.news