Satara Accident : सुरूरजवळ भीषण अपघात; बाप-लेकीचा मृत्यू

कार दोन ते तीन वेळा उलटली; १३ वर्षीय मुलासह तिघे गंभीर जखमी
Satara Accident
Satara Accident
Published on: 
Updated on: 

भुईंज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत सातारा बाजूकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून दोन ते तीन वेळा उलटली. या भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला, तर एका १३ वर्षीय मुलासह तिघे गंभीर जखमी झाले.

विजय धोंडू पवार (वय ७०) व वैष्णवी वैभव कदम ( ४३, दोघेही रा. चिपळूण) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर या अपघातात कारमधील वैभव वामन कदम ( ४५, रा. चिपळूण), वैशाली विजय पवार (वय ६२) आणि वेदांत वैभव कदम (१३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. वैभव हे कार चालवत होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण येथील कदम व पवार कुटुंबीय मुंबईहून चिपळूणकडे कारमधून (एमएच १४ बीके ७९३३) प्रवास करीत होते. वैभव कदम (४३) हे कार चालवत होते. कार सुरूर गावच्या हद्दीत हॉटेल आईसाहेबसमोर आली असता चालकाचे ब्रेक लागले नाहीत त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून ती सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकली. धडकेनंतर कार महामार्गावर दोन ते तीन वेळा उलटली.

यात विजय पवार, वैष्णवी कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक वैभव कदम, वैशाली पवार आणि वेदांत कदम हे गंभीर जखमी झाले. यानंतर स्थानिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनातील जखमींना बाहेर काढून तातडीने सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वर्षश्राद्धाला जात असताना काळाचा घाला...

दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेल्या आईवडिलांना परत गावी सोडून चिपळूण येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमाला निघाले असता वाटेत ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. अपघातस्थळाचे दृश्य भयावह होते. रक्ताचा सडा पडला होता. या दुर्घटनेने परिसर भेदरून गेला. दरम्यान, भुईंज व वेळे या दरम्यान दररोज वाढणारे अपघात विचारात घेऊन जिल्हा पोलिस दलाने विशेष यंत्रणा उभी करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.