

लोणंद : सालपे घाटाच्या शेवटच्या उतारावर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भरधाव मालट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. रक्षाबंधनासाठी जात असताना काळाने घाला घातला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. तानाजी खंडू खराडे (वय ५१) आणि रेखा तानाजी खराडे (४९, रा. तडवळे संमत कोरेगाव, ता. कोरेगाव) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
खराडे हे पत्नी रेखा यांच्यासह मोटारसायकलवरून (एमएच ११ सीएफ ६८५४) निघाले होते. तानाजी यांची बहीण निंबोडी येथील असल्यामुळे ते तिच्याकडे रक्षाबंधनासाठी निघाले होते. सालपे घाट उतरत असताना घाटाच्या उतारावर मालट्रक (एमएच १२ एसएक्स ६३७७) वरील चालकाने वाहन भरधाव चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
शुक्रवारीच रक्षाबंधनाला जाता आले असते तर...
तानाजी खराडे हे चालक म्हणून खासगी वाहनावर काम करत होते. शुक्रवारी त्यांना बाहेरगावी जावे लागल्यामुळे रक्षाबंधनाला जाता आले नव्हते. त्यामुळे शनिवारी ते पत्नी रेखाच्या सोबत निंबोडी (ता. फलटण) येथील बहिणीकडे निघाले होते. मात्र, सालपे घाटात भीषण अपघाताने त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात मुलगा व विवाहित मुलगी आहे.