

कराड : एसटी महामंडळाच्या बसला भरधाव कंटेनरची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. तर बसमधील वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गोटे ता. कराड गावच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातानंतर कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
मझाईर शहा (वय 26, रा. जम्मू-कश्मीर) असे अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याबाबत अपघात स्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसटी चालक शुभम खोंद्रे (वय वर्ष 26) व वाहक राजेंद्र माळी (वय 35, रा. शेणोली स्टेशन, ता. कराड,) हे इचलकरंजी-मुंबई एसटीमधून 20 प्रवासी घेऊन इचलकरंजीहून मुंबईला निघाले होते. पुणे-बंगळूर महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गोटे गावच्या हद्दीत आले असता पाठीमागून कंटेनरची धडक बसली.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा चालक मझाईर शहा याचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. कराड शहर पोलिस ठाण्याच्या अपघात विभागाचे हवालदार धीरज चतुर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केला.