

नागठाणे : सातार्यातील वायसी कॉलेजमध्ये परीक्षा देऊन घरी निघालेल्या युवतीवर बुधवारी काळाने घाला घातला. पुणे-बंगळूर महामार्गावरील बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवती जागीच ठार झाली. या अपघातात तिची मैत्रीणही जखमी झाली आहे. साक्षी सचिन देशमुख (वय 22, रा. तारळे, ता. पाटण) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. तर साक्षी अमृत ढाणे (वय 21, रा. पाडळी, ता. सातारा) ही जखमी झाली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, साक्षी देशमुख व साक्षी ढाणे या मैत्रिणी सातार्यातील वायसी कॉलेजमध्ये शिकत होत्या. बुधवारी परीक्षा झाल्यानंतर त्या सातार्यातून महामार्गावरून दुचाकीवरून गावीजात होत्या. दुपारी 2.15 च्या सुमारास बोरगाव गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरने साक्षीच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांची दुचाकी काही अंतरावर जावून पडली. या अपघातात साक्षी देशमुख हिला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
तर साक्षी ढाणे जखमी झाली. स्थानिकांनी तिला रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर कंटेनर चालकाने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच सपोनि संदीप वाळवेकर, पीएसआय स्मिता पाटील, हवालदार जयवंत बुधावले यांनी घटनास्थळी धाव घेतली.