

सातारा : 'पक्षासाठी घरदार बाजूला ठेवून वर्षानुवर्षे संघर्ष करायचा, सत्ताधाऱ्यांचे प्रलोभन झुगारायचे आणि निवडणुकीत पक्षाच्या आदेशासाठी स्वतःची राजकीय माघार घ्यायची; मात्र पक्षानेच सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करायची असेल तर सामान्य कार्यकर्त्यांनी विरोधकांशी लढायचे तरी कशासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित करत अभयसिंह जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि माण-खटाव विधानसभा अध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे माण-खटावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पाठवलेल्या राजीनामापत्रातून पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षफुटीनंतरही शरदचंद्र पवार यांच्याशी निष्ठा राखत नव्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात घराघरांत पक्षाचे नवे चिन्ह पोहोचवले. शरद पवार यांच्या शब्दाखातर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसतानाही आदेशानुसार ताकदीने लढा दिला. विरोधकांकडून प्रलोभने दाखवली जात असतानाही माघार घेतली नाही, असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी विचारधारेशी तडजोड केल्याची भावना निर्माण झाल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला आहे. हे विधेयक केवळ खासदारांची संख्या वाढवणे आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यापुरते मर्यादित नसून लोकसभा मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित करण्याचाही त्यात महत्त्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेपासूनच भाजपचे नेते हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत आगामी लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेतही भाजपला अनुकूल निर्णय होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
अशा परिस्थितीत विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांना आपलाच पक्ष पाठिंबा देत असल्याचे पाहून वेदना होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'सगळेच जण स्वतःचा स्वार्थ पाहणार असतील, तर निस्वार्थीपणे काम करणारा मूर्ख ठरतो,' अशा शब्दांत त्यांनी पक्षातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. विरोध करायचाच असेल तर भाजपला ठामपणे विरोध करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देण्यात गैर का?, असा सवालही त्यांनी केला आहे. शरद पवार यांच्यावरील प्रेम आणि आदर कायम राहील; मात्र पक्षाच्या सध्याच्या निर्णयांशी सहमत नसल्याने आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. अनेक वर्षे साथ देणाऱ्या पक्षातील वरिष्ठांचे आभार मानत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील या टप्प्याला पूर्णविराम दिला आहे.
‘आम्हीच नुकसान का करून घ्यायचे?’
राजीनामापत्रातील सर्वाधिक आक्रमक भूमिका त्यांनी पक्षाच्या राजकीय भूमिकेबाबत मांडली आहे. मतदारसंघात बलाढ्य विरोधकांशी संघर्ष करताना सामान्य कार्यकर्त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होते. सत्ताधाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, पक्षातील वरिष्ठांना या कार्यकर्त्यांच्या संघर्षाची जाणीव नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पक्ष भाजपशीच हातमिळवणी करणार असेल तर कार्यकर्त्यांनी भाजपमध्येच जाणे योग्य नाही का? मग उगीच भाजपला अंगावर घेऊन स्वतःचे नुकसान कशासाठी करून घ्यायचे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.