

खटाव : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून वडूज आणि दहिवडी नगरपंचायतींसाठी एकूण आठ कोटी 80 लाखांचा निधी विविध लेखाशिर्षांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.
राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत दहिवडीसाठी चार कोटी 80 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी दोन कोटी, शॉपिंग कॉम्प्लेक्स पहिला व दुसरा मजला बांधकाम करण्यासाठी दोन कोटी, प्रशासकीय इमारतीच्या फर्निचरसाठी 50 लाख, सांस्कृतिक सभागृहासाठी 30 लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वडूज नगरपंचायतीसाठी पावणेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वडूजमध्ये क्रिडांगण विकसित करण्यासाठी 50 लाख, उद्यानासाठी 75 लाख, नगरपंचायत इमारत बांधकामासाठी दीड कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
विशेष रस्ता अनुदानातून दहिवडीसाठी 90 लाख आणि वडूजसाठी 35 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दहिवडीतील प्रभाग क्रमांक पाच, बारा आणि सतरा मधील रस्ते आणि गटर बांधकाम केले जाणार आहे. वडूजमधील हुतात्मा हायस्कूल ते स्मारक रस्ता आणि गटर तसेच प्रभाग सोळा मधील रस्त्याचे काम केले जाणार आहे.