

सातारा : सातारा जिल्ह्यातील 55 प्राथमिक शिक्षकांना पहिल्या टप्प्यात जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला.
1 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामविकास विभागाचा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात व नंतर नियुक्तीबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला. तदनंतर खऱ्या अर्थाने या कामास वेग आला. सातारा जिल्हा परिषदेने 9 जून 2005 रोजी 515 पदासाठी जाहिरात काढली होती . या जाहीरातीनुसार निवड प्रक्रिया सुरु केली. यातील काही शिक्षकांना 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती आदेश आले व त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांची नियुक्त झाली. या शासन निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील बऱ्याच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली.
त्याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सातारा यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य प्रतिनिधी अतुल कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष रितेश गायकवाड, पाटण तालुका अध्यक्ष महेंद्र सावर्डेकर, भरत राऊत, तुपसमिंदर, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी गुरव, ऋतुजा रणसिंग, महिला कोषाध्यक्षा सुषमा राऊत, जिल्हा उपाध्यक्षा अनुजा पवार, सुनिता अरगडे उपस्थित होत्या.