Shivendraraje Bhosale | सातारा जिल्ह्यातील ५३ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी : ना. शिवेंद्रराजे भोसले

कृषी पंपांची १ हजार ६८ कोटींची थकीत विज बिले माफ
Shivendraraje Bhosale
Shivendraraje bhosalePudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील ५३ हजार ७३६ शेतकर्‍यांची ५६९ कोटींची कर्जमाफी होणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या इतिहासात ही सर्वात मोठी कर्जमाफी ठरली आहे. तसेच जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार शेतकरी ग्राहकांच्या ७.५ एच.पी.पर्यंतच्या कृषिपंपांची १ हजार ६८ कोटींची थकीत विजबिले माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने त्याचा राज्यातील ५६ लाख शेतकर्‍यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ होणार आहे. नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द केली आहे. या फायदा सातारा जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांना होणार आहे. कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांमध्ये सातारा जिल्हा बँकेतील ४१ हजार ४२१ इतके आहेत. आयडीबीय बँक १ हजार ३५, एसबीआय १ हजार ५१, महाराष्ट्र बँक ४ हजार ९०५, आयसीआयसीआय बँक ३७२, फेडरल बँक २१, बँक ऑफ इंडियाचे ३ हजार ४४७ खातेदार आहेत. पात्र शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक असून डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे खात्यावर जमा होणार आहेत.

ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील ऑक्टोंबर २०२४ पूर्वीची ७.५ एच.पी.पर्यंतच्या थकीत कृषी पंपांची विज बिले माफ करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार शेतकर्‍यांना १ हजार ६८ कोटींचा थकीत वीज बिलापोटी फायदा होणार आहे. कोणतीही निवडणूक नसताना सरकारने हे महत्त्वाकांक्षी शेतकरी हित समोर ठेवून महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने सोयाबीनची ३ हजार १९८ कोटी रुपयांना खरेदी केली.

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी सुमारे २४ नवी धरणे आणि १६ जुन्या धरणांची उंची वाढवण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ६ लाख कोटींची कामे करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, रामकृष्ण वेताळ, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news