सातारा : जिल्ह्यात 15 दिवसांत 5 खून; जनमानस हादरले

कराड येथील खुनाचे गूढ अद्याप कायम
Satara crime report
सातारा जिल्ह्यात 15 दिवसांत 5 खूनFile Photo
Published on
Updated on
विठ्ठल हेंद्रे

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 5 खून झाले. एकामागून एक घडलेल्या या खुनांच्या मालिकेने सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, माण तालुके हादरले आहेत. यातील कराड येथील खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. दरम्यान, वैयक्तिक कारणांमधून घडणार्‍या खुनांच्या मालिकेने पोलिसांचा घामटा निघाला आहे.

पाच खुनांपैकी चार खुनांची उकल झाली आहे. एकीकडे उत्सव, बंदोबस्ताचा ताण दुसरीकडे खुनांची मालिका यामुळे पोलिसांचा अक्षरश: घामटा निघाला. यातील खुनांची कारणे पाहिली असता तात्कालिक कारणे असल्याचे समोर येत आहे. खुनाच्या घटनेत संशयितांना पकडल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी झाल्यानंतर त्याची खातरजमा केल्यानंतर निश्चिती होते. यामुळे यातील गुन्ह्यांमध्ये आणखी आर्थिकसह नाजूक काही कारणे आहेत का? याचा पोलिस तपास करत आहेत.

तृतीयपंथी..प्रेम..लोच्या अन् मर्डर

म्हसवड, ता. माण येथील मर्डर मिस्ट्रीचे भलतेच कारण समोर आल्यानंतर सारेजण अवाक् झाले. तृतीयपंथी व्यक्तीला दगड बांधून विहिरीत टाकल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. ओळख पटल्यानंतर अवघ्या काही तासातच मारेकर्‍यांची नावं समोर आली. तृतीयपंथीचे प्रेमप्रकरण सुरु असताना लग्न करण्याचा तगादा लावण्यात आला. यातच लोच्या झाला आणि तिघांनी मिळून मर्डर केला.

पाय बांधून दगडाने ठेचले

नागठाणे, ता. सातारा येथे महिलेचा निर्घृण खून झाल्याने परिसर हादरुन गेला. जुन्या भांडणाच्या कारणातून संशयित मारेकर्‍यासोबत वाद झाला. ते दोघे एकत्र राहत होते. मात्र, हा वाद एवढा विकोपाला गेला की मारेकरी कमालीचा हिंस्त्र बनला. त्याने महिलेला बेदम मारहाण केली. ती असहाय्य झाल्यानंतर तिचे पाय बांधून दगडाने तिचे तोंड ठेचत गंभीर

दुखापत केली. मन हादरवून

सोडणार्‍या या कृत्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अशा गंभीर जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

वेटरचा गिर्‍हाईकाकडून गेम

कोळकी (ता. फलटण) येथे हॉटेलमध्ये परप्रांतीय वेटर म्हणून कामगार काम करत असताना त्याला मॅनेजरने आणखी एक काम सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. यातून दोघा मारेकर्‍यांनी त्या वेटरची चेष्टा केली. यातून वेटरने दोघांना जाब विचारताच दोन्ही हल्लेखोर वेटरवर तुटून पडले. लोखंडी सळईने बेदम मारहाण करत त्याचा गेम केला. भरदिवसा हॉटेलमध्ये घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला.

दुकानदाराला का व कुणी मारलं?

कुसूर (ता. कराड) येथून दुकानदार बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी निर्जनस्थळी त्याचा मृतदेह सापडला. मृत्यू नेमका कशाने झाला हे तपासण्यासाठी शवविच्छेदन केले असता तीक्ष्ण हत्याराने वार झाले असल्याचे समोर आले. गेल्या 20 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे गूढ अद्याप कायम आहे. कराड पोलिस, एलसीबी पोलिसांनी या खुनाचा छडा लावण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. मात्र अजून तरी खुनाची गुत्ती उलगडलेली नाही. यामुळे दुकानदाराला का व कुणी मारलं? असा सवाल उपस्थित झाला आहे.

ड्रायव्हरकडून क्लिनरचा खून

पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे टेम्पोचालक व क्लिनरचा वाद झाला. त्या वादातून चिडून जाऊन चालकाने क्लिनरचा खून केला. केरळकडे साहित्य घेऊन जाण्यासाठी हे दोघे निघाले होते. मात्र, दोघांची पिंपोडे येथे वादावादी झाल्यानंतर चालकाने क्लिनरला गंभीर दुखापत केली. यामध्ये रक्तस्त्राव झाल्याने क्लिनरचा खून झाल्याचे समोर आले. मारहाण करुन चालक घरासमोर टेंपो लावून पसार झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news