

सातारा : सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 41 हजार 986 घरकुलांना मंजुरी दिली असून 3 हजार 139 घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरीत घरकुलांची कामे प्रगतीत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात टप्पा दोनमध्ये 25 हजार 298 घरकुले प्रगथीपथावर आहेत व अद्याप 13 हजार 549 लाभार्थींनी घरकुलांची कामे सुरु केलेली नाहीत.
जिल्ह्यात घरकुलासाठी पाया खुदाई , पाया भरणे, बांधकाम साहित्य आणलेले लाभार्थी 5 हजार 388 आहेत. तर 6 हजार 902 लाभार्थ्यांनी घरकुलांचे जोते पूर्ण केले आहे. 13 हजार 8 घरकुलांची कामे लेंटलपर्यंत आली आहेत.
लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा कक्षामार्फत तालुका व ग्रामपंचायतस्तरावर लाभार्थी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. क्षेत्रिय अधिकाऱ्यांना पालक म्हणून नेमणूक करुन घरकुल बांधकाम बाबत लाभार्थींना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
भूमिहिन लाभार्थींना शासकीय जागा, गायरान जागा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद मालकीच्या जागा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य तसेच पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय योजना या योजनेतून 500 चौ. फूटपर्यंत जागा खरेदीसाठी रुपये 1 लाखापर्यंत अर्थसहाय उपलब्ध करुन दिले जात आहे. लाभार्थीना 5 ब्रास मोफत वाळू उपलब्धतेसाठी महसूल विभागाशी समन्वय साधला जात आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वरील सर्व घरकुले 31 डिसेंबरअखेर पूर्ण केल्यास ग्रामपंचायतीस 9 गुण मिळणार आहेत.
सर्व लाभार्थींनी आपली घरकुले वेळेत पूर्ण करुन ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये 100 टक्के गुण मिळण्यासाठी सहकार्य करुन हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे.
लाभार्थींच्या सहकार्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी, तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुका आवास कक्ष कार्यरत असल्याचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी सांगितले.