Satara News: जिल्ह्यात साडेतीन लाख मतदार अवैध

आठही मतदारसंघांवर परिणाम : मतदार यादीचे शुद्धीकरण
SIR
SIR
Published on
Updated on

सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. मतदार यादीच्या डिजिटलायझेशन व पडताळणीनंतर जिल्ह्यात तब्बल ३ लाख ४३ हजार दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. जिल्ह्यात आधी नोंदणीकृत २६ लाख ५१ हजार ३४७ मतदार होते. मात्र, २३ लाख ७ हजार ४८८ मतदारांचे यशस्वी डिजिटलायझेशन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील आठही विधानसभानिहाय मतदारयादी पारदर्शक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नागरीकरण आणि वाढत्या स्थलांतरामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६२ हजार १४२ दुबार नावे आढळली असून, ती वगळण्यात आली आहेत. या मतदारसंघात ३ लाख ४४ हजार २८० मतदार होते. वाई विधानसभा मतदारसंघात ४६ हजार ३४७ आणि माण विधानसभा मतदारसंघातील ४५ हजार ६६० मतदारांची नावे कमी केल्याने मतदारांमध्ये मोठी घट झाली आहे. या मतदारसंघात ३ लाख ५३ हजार ९८७ मतदार होते.

फलटण विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ४७ हजार ६६१ मतदारांपैकी ४४ हजार ४९१ मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ३ लाख २८ हजार ५४ मतदारांमधील ४४ हजार ३६० मतदारांची नावे कमी करण्यात आली आहे. तसेच, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ३ लाख २ हजार ९४७ मतदारांपैकी ३० हजार १६ मतदार वगळण्यात आले आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ३ हजार २०२ मतदारांमधील ३६ हजार १४३ मतदार तर पाटण विधानसभा मतदारसंघातील ३ लाख २ हजार २८० मतदारांमधील ३४ हजार ११९ मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत.

या सखोल पुनरीक्षण मोहिमेची प्रारूप मतदार यादी दि. २४ ऑगस्‍ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर मतदारांना दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. नाव नोंदवणे किंवा दुरुस्तीसाठी नागरिकांना आपल्या परिसरातील बुथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे.

मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुबार किंवा पुनरावृत्ती झालेली नावे, अपात्र मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. चुकीच्या माहितीमुळे नाव कमी झाल्यास अर्ज भरून नव्याने नोंदणी करता येणार आहे.

जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचे काम अंतिम टप्प्यात आहे. दि. २४ ऑगस्टला जाहीर होणारी प्रारूप यादी गावागावांतील मतदान केंद्रांवर उपलब्ध असेल. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारयादी बिनचूक आणि पारदर्शक होणार आहे.
-भगवान कांबळे निवडणूक उपजिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news