Satara water crisis: जिल्ह्यातील 289 गावांमध्ये पाणीबाणी

वाड्या-वस्त्यांच्या घशाला कोरड : सुमारे 55 टँकरने पाणीपुरवठा
Satara water crisis: जिल्ह्यातील 289 गावांमध्ये पाणीबाणी
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईची ओरड जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील 60 गावे व 229 वाड्यांमधील 72 हजार 50 नागरिक व 31 हजार 20 जनावरांना 55 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विहिरी, तलाव, बंधारे, नदी, धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. दिवसेदिवस टँकरची मागणी वाढू लागली आहे.

माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, संभूखेड, कारखेल, वरकुटे-म्हसवड, पर्यंती, मार्डी, इंजबाव, खुटबाव, भालवडी यासह 37 गावे 208 वाड्यांमधील 46 हजार 404 नागरिक व 23 हजार 508 जनावरांना 30 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाई तालुक्यातील गुंडेवाडी, मांढरदेव, बालेघर, आनंदपूर या 4 गावांसह 7 वाड्यांतील 4 हजार 339 नागरिक व 2 हजार 68 जनावरांना 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

फलटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, भोसगाव, शिद्रुकवाडी, कोळेकरवाडी यासह 6 वाड्यांमधील 1 हजार 292 नागरिक व 993 जनावरांना 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खटाव तालुक्यातील एनकूळ, दातेवाडी, यलमारवाडी, खातवळ, कणसेवाडी, जायगाव, कामथी, कातळगेवाडी, रणसिंगावाडी, जाखणगाव, गारवडी, मोळ, मांजरवाडी, रणसिंगवाडी यासह 14 गावे व 8 वाड्यांमधील 15 हजार 721 नागरिक व 2 हजार 441 जनावरांना 16 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

कोरेगाव तालुक्यातील बिचुकले, विखळे, चवणेश्वर या 3 गावातील 3 हजार 715 नागरिक व 1 हजार 744 जनावरांना 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर महाबळेश्वर तालुक्यातील भिमनगर येथील 153 नागरिकांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी सुमारे 22 विहिरी व 14 बोअर अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news