Satara Water Supply : सातार्‍याला २४ तास पाणीपुरवठ्याचा संकल्प

नगराध्यक्ष अमोल मोहिते - ॲड. डी.जी. बनकर : कास धरणाचे ओटीभरण
Satara Water Supply : सातार्‍याला २४ तास पाणीपुरवठ्याचा संकल्प
Published on
Updated on

सातारा : हजारो सातारकरांची तहान भागवणारे कास धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा पालिकेच्या वतीने रविवारी परंपरेनुसार धरणाचे कृतज्ञतापूर्वक ओटीभरण करण्यात आले. कास धरणाची साठवण क्षमता तब्बल पाच पटीने वाढल्याने आगामी काळात सातारा शहरासह हद्दवाढ भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा संकल्प असल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर यांनी दिली.

कास धरणाचे पालिकेकडून दरवर्षी कृतज्ञतापूर्वक ओटीभरण केले जाते. यंदाही हा सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. कार्यक्रमानंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून कास धरणाची उंची वाढवण्यात आली. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या धरणात अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, त्याचा शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे.

उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर म्हणाले, कास धरणाची क्षमता पाच पटीने वाढल्याने पुढील पाच वर्षे पाऊस झाला नाही तरी सातारकरांना पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आले आहे. सध्या धरणातून शहराला सात ते आठ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. नवीन जलवाहिनीमुळे ही क्षमता आता २१ एमएलडीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सातारा शहरासह हद्दवाढ भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाण्याची उपलब्धता वाढली असली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही बनकर यांनी केले.

यावेळी गटनेते अविनाश कदम यांनी कास धरणाच्या ओटीभरण सोहळ्यामागील भूमिका सांगितली. यावेळी बांधकाम सभापती धनंजय जांभळे, शिक्षण समिती सभापती शंकर किर्दत, नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेवक शंकर माळवदे, राजू गोरे, नगरसेविका आशा पंडित, हेमलता भोसले यांच्यासह पालिकेच्या पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news