

सातारा : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हॉटेल्स, दूध संकलन केंद्र व बेकरीतून घेतलेल्या खाद्यपदार्थांचे 10 नमुने अन्न सुरक्षा मानकानुसार असुरक्षित आढळले आहेत. चहा पावडर व गूळ यामध्ये रंग तर दुधात साखरेची भेसळ असल्याचे प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. संबंधितांवर खाद्य सुरक्षा व मानके अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
दै. ‘पुढारी’ने ‘जिल्ह्यात भेसळखोरांनी हात-पाय पसरले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर अन्न व औषध विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. या वृत्तानंतर विविध तालुक्यांत कारवायांचा सपाटा लावण्यात आला. यानंतर केलेल्या तपासणीत अन्नाचे हे नमुने असुरक्षित आढळून आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त तुषार शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षकांनी कराड, कोरेगाव, माण, फलटण तसेच वाई तालुक्यांत ठिकठिकाणी कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित तालुक्यातील बेकरी, हॉटेल्स, दूध संकलन केंद्रे आणि बेकरी दुकाने याठिकाणी अन्न पदार्थांचे तपासणीसाठी 293 नमुने घेतले होते. त्यामध्ये 10 नमुने हे असुरक्षित ठरले आहेत. दुधात साखरेची भेसळ, चहा पावडर व गुळामध्ये रंग मिसळल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत निष्पन्न झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या नमुन्यात पेर्ले ता. कराड येथील हॉटेल विठ्ठल कामतमध्ये चहा पावडरमध्ये रंग असल्याचे आढळले आहे. कोरेगाव जुना मोटर स्टँड येथील लक्ष्मी बेकरीत बेकरी पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या गुळामध्ये रंग असल्याचे निष्पन्न झाले आहे. भोसे (ता. कोरेगाव) येथील वडाचीवाडीमधील साई मिल्क अँण्ड मिल्क, सासवड (ता. फलटण) येथील वाघेश्वरी दूध संकलन केंद्रातील म्हैशीच्या दुधात, माळेवाडी (ता. फलटण) येथील माळेवाडी दूध उत्पादक मंडळाच्या एकत्रित दूधात, दहिवडी (ता. माण) येथील शिवगंगा मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टच्या टोन्ड दुधाच्या नमुन्यात, बोंबाळे (ता. खटाव) येथील हॅटसन अॅग्रो प्रोडक्ट्सच्या एकत्रित दुधात, भुईंज (ता. वाई) येथील श्रीराम दूध संकलन केंद्रातील गायीच्या दुधात, पाचवड (ता. वाई) येथील पाचवड दूध उत्पादक मंडळाच्या एकत्रित दुधातही साखरेची भेसळ असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल आला आहे.
दूधाच्या नमुन्यांची पहिली चाचणी असुरक्षित आल्यानंतर केलेल्या फेरचाचणीतही हे नमुने दोषी आले आहेत. त्यामुळे दूध भेसळीप्रकरणी संबंधितांवर कारवाई अटळ असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित तालुके भेसळीचे आगार बनल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे.
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी साखरेऐवजी स्टार्च व गुळात रंग वापरला जातो. पदार्थाची चव व रंग ग्राहकांना आकर्षक वाटावेत म्हणून रासायनिक रंग वापरला जातो. दूध साठवण व वाहतूक सोपी व्हावी म्हणून त्यात पावडर मिळसली जाते. तसेच दुधाचा दर हा डिग्रीवर असल्यामुळे त्यामध्ये साखरेची भेसळ करून डिग्री वाढवली जाते. अन्न पदार्थांतील ही भेसळ प्राथमिक टप्प्यापासून वर वाढताना दिसते.