सातारा ; पुढारी वृत्तसेवा : उसाचे वाढलेले क्षेत्र आणि टोळ्यांची कमतरता यामुळे यंदा राज्यात तब्बल 33 लाख टन ऊस उभा आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात 1 लाख मेट्रीक टन ऊस अद्याप शेतातच आहे. यामध्ये वाई व जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस असून इतर तालुक्यांमध्ये हे प्रमाण कमी आहे. हा ऊस तोडण्यासाठी नियोजन करण्यात आले असून मे अखेरीपर्यंत हा ऊस तोडण्यात येणार असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयातील अधिकार्यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील किसनवीर, खंडाळा आणि प्रतापगड हे कारखाने बंद असल्याने जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न उभा राहिला. दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यात तब्बल 5 लाख टन ऊस उभा होता. त्यामुळे दै. 'पुढारी'ने यावर आवाज उठवला. याची दखल घेत सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना हा ऊस कोणत्याही परिस्थितीत तुटला पाहिजे, असे आदेशच दिले. यानंतर आयुक्त गायकवाड यांनी सातारा व पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक घेतली. यामध्ये किसनवीरचा शिल्लक राहिलेला ऊस तोडीसाठी व गाळपासाठी नियोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील अजिंक्यतारा, जरंडेश्वर, स्वराज, दत्त इंडिया, सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती साखर कारखान्यांनी उसाची
तोड करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर हळू हळू उसाची तोड होत गेली. वाढलेला उन्हाचा पारा आणि टोळ्या आपल्या गावी परतत असल्याने अनेक कारखाने बंद पडले आहेत. मात्र, याही परिस्थिती अजिंक्यतारा आणि जरंडेश्वर कारखान्याकडून उसाची तोड सुरूच आहे.
सध्याच्या घडीला किसनवीरच्या कार्यक्षेत्रात येणार्या वाई तालुक्यात 68 हजार तर जावली तालुक्यात 10 हजार टन ऊस शिल्लक आहे. इतर सर्व तालुक्यांमध्ये 25 ते 30 हजार टन ऊस शिल्लक आहे. अजिंक्यतारा व जरंडेश्वर कारखान्याकडून ही ऊस तोड केली जाणार आहे. त्यासाठीहे कारखाने मे महिन्याच्या अखेरीपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील उस या महिना अखेरीपर्यंत संपण्याची शक्यता आहे.
सातार्यासह राज्यात जो ऊस शिल्लक आहे. त्यासाठी राज्य सरकारने रिकव्हरी लॉस आणि ऊस तोडणी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शेतकर्यांना होणार आहे. त्यामुळे दोन महिने उशीरा ऊस गेल्यानंतरही अनुदानाचा फायदा शेतकर्यानां होणार आहे. परंतु, हा फायदा संबधित कारखाना देतो की नाही याची पडताळणी आयुक्तांनी करणे गरजेचे आहे. सध्या 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' अशी अवस्था शेतकर्यांची झाली आहे. याचाच गैरफायदा कारखाने घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम एफआरपी काटेकोरपणे तपासून उर्वरित रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे.
जावली व वाई तालुक्यात सर्वाधिक ऊस शिल्लक आहे. हा ऊस नेण्यासाठी जरंडेश्वर व अजिंक्यतारा कारखान्याने तयारी दर्शवली असून या महिन्याअखेरीस जिल्ह्यातील सर्व उसाचे गाळप होणार आहे.
-डी. एन. पवार, जिल्हा विशेष लेखा परिक्षक (साखर)