Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala : पालखीसाठी फलटणचा आरोग्य विभाग सज्ज

भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक नियोजन
Ashadhi Wari
Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्जfile photo
Published on
Updated on

पोपट मिंड

फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण तालुक्यात येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. दि. १५ ते १९ जुलै या कालावधीत तरडगाव ते साधूबुवाचा ओढा या पालखी मार्गावर विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांनी दिली.

सभापती भोसले म्हणाल्या, पालखी मार्गावरील तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ६ शासकीय व ६६ खासगी अशा एकूण ७२ वैद्यकीय संस्था, ६३३ खाटांची व्यवस्था तसेच ५० विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत.

पालखी मार्गावर ४ स्थिर वैद्यकीय मदत पथके, ११ एचबीटी आपला दवाखाना केंद्रे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव, पालखी तळ, ग्रामीण रुग्णालय बरड आदी ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय ३ आयसीयू पथके कार्यरत राहणार असून त्यामध्ये फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, मॉनिटर आणि व्हेंटिलेटरसह आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. भाविकांच्या आपत्कालीन उपचारासाठी ३ रुग्णवाहिका (१०२), ३ रुग्णवाहिका (१०८) तसेच ४६ फिरती वैद्यकीय पथके (आरोग्यदूत/दुचाकी स्वार) पालखी मार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. एकूण ६५ वैद्यकीय मदत पथकांद्वारे पालखी मार्गावर सातत्याने आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. अन्न व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी ३ हॉटेल ओटी (अन्न सुरक्षा) निरीक्षण पथके कार्यरत राहणार असून हॉटेलमधील पिण्याच्या पाण्याची तपासणी, अन्नपदार्थांची पाहणी तसेच आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. याशिवाय २९ पाणी शुद्धीकरण पथके आणि ३० टँकर फिलिंग पॉइंट पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत.

आरोग्य विभागाने दोन ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केले असून जिल्हा परिषद सातारा व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे नागरिकांना आवश्यक माहिती व मदत उपलब्ध होणार आहे. पालखी मार्गावर आरोग्य विभागाचे बॅनर, फ्लेक्स, जनजागृती साहित्य, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड तसेच आरोग्यदूतांच्या दुचाकींवर विशेष स्टिकर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर अंदाजे ५६० अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत. तसेच भाविकांसाठी ४११ पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध असून त्यामध्ये १२ सार्वजनिक विहिरी, ६१ बोअरवेल/हातपंप, २८५ खासगी विहिरी, १२ नळ योजना, ११ हौद (टाक्या) आणि ३० टँकर भरणा केंद्रांचा समावेश आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न, सुरक्षित व आरोग्यदृष्ट्या सक्षम वातावरणात पार पडावा, यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून भाविकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात आल्याचे सभापती शिवांजली भोसले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news