

सातारा : वडूज, ता. खटावचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भारत-म्यानमार सीमेवरील अतिधोकादायक मोहिमेत २१ पॅरा (स्पेशल फोर्सेस) पथकाने देशविरोधी काम करणाऱ्या नऊ अतिरेक्यांचा खातमा केला होता. अशा धैर्य, साहस अन् देशसेवेच्या भावनेची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते घाटगे यांना शौर्यचक्राने गौरवण्यात आले.
मूळचे वडूज गावचे रहिवासी असलेले आदित्य घाटगे यांचे बालपण साताऱ्यात गेले. निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात, तर अभियांत्रिकीचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ आयटी क्षेत्रात नोकरी केली. परंतु लहानपणापासूनच भारतीय सैन्यात देशसेवा करण्याचे स्वप्न त्यांना खुणावत असल्याने त्यांनी एसएसबी परीक्षा देण्याचा निर्धार करत तयारी केली. २००७-०८ मध्ये त्यांची निवड झाली. इंडियन मिलिटरी ॲकॅडमीच्या (आयएमए) येथे प्रशिक्षण झाल्यानंतर टेक्निकल ग्रॅज्युएट्स कोर्समध्ये गुणवत्ता यादीत त्यांचा पहिला क्रमांक आला होता आणि पासिंग-आउट परेडमध्ये पंजाबचे तत्कालीन राज्यपाल जनरल एस. एफ. रॉड्रिग्ज यांच्या हस्ते त्यांना रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले होते.भारत-म्यानमार सीमेवरील देशविरोधी तळावरील मोहिमेदरम्यान आदित्य घाटगे यांनी अढळ शौर्याचे प्रदर्शन केले. नऊ सशस्त्र दहशतवाद्यांचा खातमा केला. त्यांनी आतापर्यंत बेळगाव, काश्मीर, आसाम या ठिकाणी सेवा बजावली असून सध्या ते ईशान्य भारतात कार्यरत आहेत.