Sangli News : जिल्ह्यात ऑनलाईन बुकिंग ठप्प

एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा : प्रतिदिन 30 हजार सिलिंडरची मागणी
Sangli News
जिल्ह्यात ऑनलाईन बुकिंग ठप्प
Published on
Updated on

सातारा : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता सातारा जिल्ह्यात उमटू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात साधारणपणे दररोज सुमारे 22 हजार घरगुती गॅस सिलिंडरची नोंदवली जाणारी मागणी आता प्रतिदिन सुमारे 30 हजार सिलिंडरवर पोहोचली आहे. हा पुरवठा नियमितपणे होत असल्याने ग्राहकांना फारशी अडचण भासत नव्हती. मात्र, ग्राहकांमध्ये संभाव्य टंचाईची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, अनेक ग्राहकांनी नेहमीपेक्षा आधीच सिलिंडर बूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दररोजच्या सिलिंडर मागणीत अचानक वाढ झाली. जिल्ह्यातील गॅस एजन्सीजवर प्रचंड ताण आला असून, गॅस कंपन्यांची ऑनलाईन बुकिंग सेवा अनेकवेळा ठप्प झाली.

जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच इंडियन ऑयल या कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे वितरण केले जाते. जिल्ह्यात या कंपन्यांच्या शेकडो गॅस एजन्सी कार्यरत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस कंपन्यांच्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गॅस बुकिंगची नोंदणी होत असल्याने या सेवेवर गेली दोन दिवस प्रचंड ताण आला आहे. काही ठिकाणी ग्राहकांना बुकिंग करताना अडथळे येऊ लागले, तर काही वेळा ही सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. ऑनलाईन बुकिंग सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांच्या मनात अधिक शंका निर्माण झाली. परिणामी अनेकांनी थेट गॅस एजन्सीजकडे धाव घेतली.

जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सी कार्यालयांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. सकाळपासून ग्राहक एजन्सीसमोर येऊन सिलेंडर उपलब्धतेबाबत माहिती घेऊ लागले आहेत. काही ठिकाणी तर बुकिंग आणि वितरणाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांशी वादावादीचे प्रसंग घडल्याचेही समजते. दरम्यान, अचानक वाढलेल्या मागणीमुळे जिल्ह्यातील गॅस सिलेंडरची प्रतिदिन मागणी 30 हजारांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच नेहमीच्या तुलनेत जवळपास 8 हजार सिलेंडरची अतिरिक्त मागणी निर्माण झाली आहे. ही वाढलेली मागणी पूर्ण करणे एजन्सीजसमोर मोठे आव्हान ठरत आहे. सध्या पुरवठा सुरळीत सुरू असला तरी ग्राहकांच्या वाढत्या गर्दीमुळे व्यवस्थापन करणे कठीण होत असल्याचे एजन्सीचालकांचे म्हणणे आहे.

सध्या जिल्ह्यात गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झालेला नाही. नियमित वितरण सुरू आहे. मात्र ग्राहकांनी भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू केल्यामुळे मागणी अचानक वाढली आहे. परिणामी वितरणाचे नियोजन करताना अडचणी निर्माण होत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्राहकांनी घाईगडबडीत बुकिंग न करता आपल्या नियमित वेळेनुसार सिलेंडर मागवावा, असे आवाहन गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही एजन्सी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्यास वादावादी किंवा गोंधळ निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. सध्या प्रशासन, गॅस कंपन्या आणि गॅस एजन्सीज यांच्या समन्वयातून परिस्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news