संगम माहुलीत महाराणी ताराराणी यांचे भव्य स्मारक

मंत्री शिवेंद्रराजेंकडून आराखड्याची पाहणी :‘पुढारी’च्या पाठपुराव्याला ऐतिहासिक यश
Tararani memorial
‘पुढारी’ने 18 एप्रिलच्या अंकात महाराणी ताराराणी यांच्या उपेक्षित समाधीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधल्यानंतर सातार्‍यात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संगम माहुली येथील समाधी स्थळांच्या जीर्णोद्धारांबाबत केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी माळी व इतर.pudhari photo
Published on
Updated on

सातारा : मराठा साम्राज्यातील महापराक्रमी ताराराणी यांच्या सातार्‍यातील दुर्लक्षित समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करून संगम माहुली येथे मुघलमर्दिनी महाराणी ताराराणी यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व छत्रपती घराण्याचे वारसदार ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सोमवारी घेतला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आराखड्याची पाहणी केली. संगम माहुली येथे थोरले शाहू महाराज, महाराणी येसुबाई यांच्याही समाध्या असून त्यांचाही जीर्णोद्धार करून संगम माहुलीला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. ‘पुढारी’ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे.

करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा तर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक पराक्रम केले. एक स्त्री असूनही, त्या काळात त्यांनी औरंगजेब आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र त्यांची सातार्‍यातील संगम माहुली येथे असलेली समाधी उपेक्षित आहे. या समाधीच्या जिर्णोद्धारासाठी इतिहास प्रेमींमधून अनेकदा आवाज उठवूनही याबाबत शासन ढिम्म आहे.

दै. ‘पुढारी’ने 18 एप्रिल रोजीच्या अंकात ‘मुघलमर्दिनी महाराणी ताराराणींची समाधी उपेक्षितच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करून या प्रश्नाकडे राज्यसरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर कोल्हापूरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी इतिहासप्रेमींची बैठका बोलावून महाराणी ताराराणी यांच्या स्मारकाच्या विकास आराखड्याविषयी चर्चा केली. काही संघटनांनीही या विषयात लक्ष घातले. ‘पुढारी’च्या आवाजानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाराणी ताराराणी यांच्या स्मारकाचा विकास झाला पाहिजे. सरकारचे दुर्लक्ष होणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, या विषयात कृतीने उडी घेतली ती छत्रपती घराण्याचे वारसदार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी. सोमवारी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन महाराराणी ताराराणी यांच्या स्मारकाविषयी चर्चा केली.

शिवेंद्रराजेंनी जिल्हा प्रशासनासोबत बैठकच केली. बैठकीत वास्तूविशारद इंद्रजित नागेशकर यांनी संगम माहुली येथील प्रस्तावित स्मारक जतन व संवर्धनासंदर्भातील तयार केलेल्या आराखड्याची चित्रफीत दाखवून करावयाच्या कामांची माहिती दिली. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर संगम माहुली येथे थोरले शाहू महाराज, महाराणी येसूबाई आणि महाराराणी ताराबाई यांची स्मारके एकत्रित जतन व संवर्धित करणे तसेच इतरही काही समाधीस्थळांचे संवर्धन करणे, संगम माहुली येथील सर्व मंदिरांची डागडुजी व संवर्धन करणे, पर्यटनवाढीच्या दृष्टीने घाट विकसित करणे, विद्युत व्यवस्था करणे, नदीकाठी होणार्‍या दशक्रिया विधीच्या जागा सोयीसुविधांनी विकसित करणे, वृक्षारोपण करणे, येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे तसेच पार्किंग व्यवस्था करणे, पर्यटकांना विविध सोयी सुविधा निर्माण करणे, स्वच्छतागृह बांधणे, नदीवरून पलिकडे पायी जाण्यासाठी नदीवरील केबल ब्रिजची पुनर्रबांधणी करणे, संपूर्ण परिसर विकसित करून येथील ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढीचे स्रोत निर्माण करणे आदी चर्चा या बैठकीत करण्यात आली.

हा परिसर विकसित करताना ऐतिहासिक धर्तीवर बांधकाम करणे आणि नदीतील पुराच्या पाण्यामुळे कोणतीही हानी पोहोचू नये, अशा पद्धतीने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकार्‍यांना केल्या.शिवेंद्रराजेंनी लक्ष घातल्याने संगम माहुली परिसराला चालना मिळणार असून ऐतिहासिक स्थळांचा विकास होवून पर्यटन वाढीस मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news