

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून व सातार्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या कल्पनेतून राजधानी सातार्यातील किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरण करणे, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा करणे तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराराणी, येसूबाई राणीसाहेब, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि संगम माहुलीचा संपूर्ण परिसर विकसित करणे या कामांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्यामुळे किल्ले अजिंक्यतारा आणि संगम माहुली परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे. संगम माहुली परिसरात छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी, येसूबाई यांच्या समाधी स्थळांच्या जीर्णोद्धारासंदर्भात दै.‘पुढारी’ने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. या विषयावर ‘पुढारी’ने सर्व त्या व्यासपीठावर समस्येचा जागर केला. ‘पुढारी’च्या या भूमिकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उचलून धरले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या कामात नवनवीन संकल्पना राबवल्या आणि याबाबतचा कृतीयुक्त आराखडा तयार केला. हाच आराखडा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दाखवला होता. त्याचवेळी या विषयावर सविस्तर बैठक घेण्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (द़ृश्यप्रणालीद्वारे) अध्यक्षतेखाली व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला ना. नीलेश राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सांस्कृतिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गोविंद राज, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील (व्हीसी द्वारे) यांच्यासह सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत संगम माहुली येथील महाराणी ताराराणी, येसूबाई राणीसाहेब यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार, विकास करणे. तसेच पहिले शाहू महाराज यांच्या समाधीचा विकास करणे. याठिकाणी माहिती फलक लावणे, परिसरात अस्तित्वात असणार्या अन्य काही समाधींचे जतन आणि संवर्धन करणे, राजघराण्यातील व्यक्तींसाठीच्याअंत्यसंस्कारांच्या जागेचा विकास, नदी घाटाचे विस्तारीकरण, दशक्रिया विधी जागा घाटावरून दक्षिण बाजूस स्थलांतरित करणे, पूर्वकालीन झुलत्या पादचारी पुलाचे नवनिर्माण करणे, काशी विश्वेश्वर, रामेश्वर आणि संगमेश्वर या मंदिरांचे जतन व संवर्धन करणे, नागरिकांसाठी स्वच्छतागृह बांधणे, भविष्यातील गर्दीचा विचार करता माहुलीच्या बाजूने नवीन रस्ता विकसित करून वाहनांसाठी वाहनतळ तसेच रामेश्वर मंदिराच्या परिसरात संग्रहालयाची निर्मिती करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. या कामांसाठी काढण्यात आलेल्या ढोबळ अंदाजपत्रकानुसार 311 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
बैठकीअंती ना. अजित पवार यांनी ना. शिवेंद्रराजेंच्या मागणीनुसार या दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली. या दोन्ही प्रकल्पांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे सादर करण्याच्या सूचना ना. पवार आणि ना. शिवेंद्रराजे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
किल्ले अजिंक्यतारा येथे येणारे हजारो पर्यटक आणि मॉर्निंग वॉकसाठी येणार्या नागरिकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधेबाबतही बैठकीत चर्चा झाली. किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वार आणि दक्षिण दरवाजा या दोन्हींचे जतन आणि संवर्धन करणे, तटबंदी आणि बुरूज यांचे जतन संवर्धन करणे, अस्तित्वातील राजसदर, टांकसाळी यांचे संवर्धन पूर्वी होते त्या प्रकारे करून या इमारतींचा वापर म्युझियम म्हणून करणे, विद्यार्थ्यांना माहिती देण्याकरता हॉल, मॉर्निंग वॉक व फिरण्यासाठी पायाभूत सुविधा, पार्किंग पासून दक्षिण दरवाजापर्यंतची पायवाट व किल्ल्यावरील पायवाटा परिपूर्ण करणे.
किल्ल्यावरील पाणवठ्यांचे जतन व संवर्धन करून तेथील जैवविविधतेला हानी पोहोचू नये, या द़ृष्टिकोनातून निसर्ग अभ्यासकांना येथे येणारे पक्षी व प्राणी न्याहाळता यावेत याकरता प्रमुख तीन पाणवठ्यांवर मनोरे उभारणे तसेच ते एकमेकांना तरंगत्या पुलाने जोडणे, सहलींद्वारे येणार्या विद्यार्थ्यांना एकत्र बसून शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग व किल्ल्याचे महत्त्व सांगण्यासाठी एक एमपी थिएटर विकसित करणे, पर्यटकांसाठी दोन ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच कपडे बदलण्यासाठी खोल्या बांधणे, माहिती फलक बसवणे, पदपथांच्या बाजूने प्रकाशझोत टाकणे, विसावा स्थळे निर्माण करणे आदी विकासकामांबाबत चर्चा झाली. या कामांसाठी 112.87 कोटी खर्च अपेक्षित आहे.