

कराड : नि:पक्ष व निर्भीड दैनिक म्हणून ओळख असणार्या दैनिक ‘पुढारी’चा 86 वा वर्धापनदिन बुधवारी उत्साहात साजरा झाला. या निमित्त दै. ‘पुढारी’ कराड कार्यालयात ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ.ग.गो.जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठी मनावर ‘पुढारी’चे अधिराज्य कायम राहील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
‘पुढारी’कार पद्मश्री डॉ.ग.गो.जाधव यांच्या प्रतिमेस कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुलबाबा भोसले, माजी सहकार मंत्री सह्याद्रि सह. साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, अॅड.उदयसिंह पाटील यांनी अभिवादन केले. डॉ.अतुल भोसले म्हणाले, दै.‘पुढारी’ने नेहमीच सकारात्मक पत्रकारिता केली आहे. सामान्य जनतेचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ‘पुढारी’ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळेच ‘पुढारी’चे वाचकांशी असणारे नाते घट्ट आहे.
ते म्हणाले, स्व.यशवंतराव चव्हाण समाधी परिसराचा विकास, एमआयडीसीत नवीन उद्योग, छत्रपती शिवाजी स्टेडियम, रस्ते, क्रिडांगण अशा सर्वच बाजूंनी कराडचा विकास करून कराडचे रूपडे पालटणार आहे.
बाळासाहेब पाटील म्हणाले, नि:पक्ष व निर्भीड दैनिक म्हणून दै. ‘पुढारी’ने आपली ओळख कायम ठेवली आहे. सडेतोड पत्रकारितेबरोबर अनेक जनसंघर्षात ‘पुढारी’ने नेतृत्व केले आहे. सामान्य जनतेला न्याय मिळवून देत ‘पुढारी’ने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
अॅड.उदयसिंह पाटील म्हणाले, भारतीय सैन्यासाठी सियाचीन हॉस्पिटलची निर्मिती, पूरग्रस्तांना मदत, शेतकर्यांचे ऊस, दूध दर आंदोलन अशी भरीव व आश्वासक कामे पुढारीने मार्गी लावली आहेत. जनतेच्या न्याय हक्काचे पुढारी व्यासपीठ आहे. दै. ‘पुढारी’चे कराड कार्यालय प्रमुख सतीश मोरे व परिवाराने मान्यवरांचे स्वागत केले.