

कराड : सह्याद्रि कारखान्याच्या आजुबाजूला नव्याने उभा राहिलेले कारखाने प्रगती करत असताना सह्याद्रि कारखाना मात्र डबघाईच्या दिशेने जात आहे. कारखाना विस्तारवाढीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा कर्ज घेतले. त्याचा फटका सभासदांना बसत आहे. तुमच्या फायद्यासाठी बदनाम झालेल्या कंपनीला काम दिले. चार वर्षांपासून ते काम सुरु आहे. कारखाना मोडीत काढून खाण्याची विद्यमान चेअरमन यांची भूमिका आहे, असा घणाघात रामकृष्ण वेताळ यांनी केला.
पाल येथे सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्रि स्वाभीमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी धैर्यशील कदम, निवास थोरात यांच्यासह अनेकांनी आजी माजी आमदारांवर सडकून टीका केली. रामकृष्ण वेताळ म्हणाले, सभासदांच्या मालकीचा असलेला कारखाना विद्यमान चेअरमन स्वत:ची प्रॉपर्टी असल्यासारखे वापरत आहेत. दरम्यान, आमची पॅनेल निवडून आल्यानंतर कारखान्याच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी नवीन उद्योग सुरू करणार. पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्याचं काम करणार आहे.
धैर्यशील कदम म्हणाले, तुम्ही आम्हाला कस्पटासमान पॅनेल म्हणता हे कस्पटासमान पॅनेल तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही. सह्याद्री कारखान्यात परिवर्तन घडवून सर्वसामान्य सभासद शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सह्याद्री शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच लढा देत राहिलो. कराड तालुक्यातील नेतृत्वाला संधी देऊ अशी भूमिका विद्यमान आमदारांसमोर मांडली होती परंतु त्यांना आमदारकी बरोबर कारखानाही आपल्याकडेच हवा आहे. चार महिन्यांपूर्वी यांना गुलाल मिळावा म्हणून आम्ही सर्वांनी केलेले प्रयत्न ते सोयीस्करपणे विसरले.
निवास थोरात म्हणाले, आमच्या लढ्यामुळेच 2221 सभासदांना न्याय मिळाला. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आमची लढाई आहे. सहकारातील निवडणूक समविचारी लोकांना सोबत घेऊन लढण्याची आमची नेहमी भूमिका होती. मात्र विद्यमान आमदारांनी आमच्यावर कटकारस्थान केली. अंधारात ठेऊन एका बाजूला पूर्ण पॅनेल उभे केले आणि दुसर्या बाजूला चर्चा सुरू ठेवल्या. तुम्हाला निवडणूक लढायची होती तर समोरासमोर येऊन लढायला पाहिजे होत. यावेळी सागर शिवदास, सुदाम चव्हाण, भीमराव डांगे, शिवाजी चव्हाण, अमित जाधव, अविनाश नलवडे, विश्वास जाधव, भाऊसाहेब घाडगे, संग्राम पवार यांची उपस्थिती होती. भीमराव पाटील, संपतराव माने, डॉ. सत्यजित काळभोर, सचिन नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ सत्यजित काळभोर यांनी केले. आभार कुणाल काळभोर यांनी मानले.