Dhebewadi rural hospital: ग्रामीण रुग्णालय ‌‘डॉक्टरविना‌’च सुरू?

ढेबेवाडीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल!; निर्धारित वेळेत डॉक्टरांची अनुपस्थिती
Dhebewadi rural hospital
Dhebewadi rural hospital: ग्रामीण रुग्णालय ‌‘डॉक्टरविना‌’च सुरू?Pudhari Photo
Published on
Updated on

सणबूर : ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा शेवटचा आधार असलेले ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय सध्या ‌‘डॉक्टरविना रुग्णालय‌’ अशीच अनोखी आणि ओळख निर्माण करत आहे. डॉक्टरांची निर्धारित वेळेत अनुपस्थिती, कर्मचाऱ्यांची बेजबाबदार वृत्ती आणि व्यवस्थापनातील ढिसाळपणा यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा अक्षरशः उघडी पडली आहे.

मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 4 वाजता परिसरातील विविध खेडेगावांतून रुग्ण उपचारासाठी ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात आले होते. मात्र, रुग्णालयातील नियमित वैद्यकीय अधिकारी निर्धारित वेळेत अनुपस्थित असल्याचे समोर आले. परिणामी, उपचारासाठी आलेले रुग्ण तासंतास ताटकळत राहिले. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असतानाही त्यांना वेळेवर तपासणी व उपचार मिळाले नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच ढेबेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते शेखर लोखंडे यांनी रुग्णालयात धाव घेऊन कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र, डॉक्टर कुठे आहेत? कधी येणार? याबाबत कर्मचाऱ्यांकडे कोणतेही निश्चित उत्तर नव्हते. विशेष म्हणजे, अनेक कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र नसल्याचे दिसून आले. ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर काही कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, थेट प्रशासनाची अपयशी देखरेख आणि जबाबदारी झटकण्याची वृत्ती दर्शवतो. ढेबेवाडी परिसरातील अनेक नागरिक 5 ते 10 किलोमीटर अंतर पार करून या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, डॉक्टर वेळेवर नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. परिणामी, गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांवर अनावश्यक आर्थिक ओझे लादले जात आहे.

शासकीय रुग्णालयात वेळेवर डॉक्टरच मिळत नसतील, तर सामान्य नागरिकांनी जगायचे कसे? असा थेट आणि संतप्त सवाल शेखर लोखंडे यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था इतकी असंवेदनशील कशी बनली? याला जबाबदार कोण? वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आणि वरिष्ठ प्रशासनावर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.

सरकार एकीकडे ‌‘सर्वांसाठी आरोग्य‌’ आणि ‌‘ग्रामीण आरोग्य बळकटीकरण‌’ यासारख्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर वेळेवर नसणे, कर्मचारी बेफिकीर असणे आणि यंत्रणा गेंड्याच्या कातडीची बनणे, हे वास्तव अत्यंत चिंताजनक आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट प्रश्न प्रशासनासमोर उभा राहतो.

शासनाने या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घेऊन ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची नियमित उपस्थिती, शिस्तबद्ध कर्मचारी व्यवस्था आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणा लागू करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, ग्रामीण जनतेचा सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पूर्णतः उडून जाण्यास वेळ लागणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news