सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बांधणी नव्याने सुरु आहे. जनतेच्या हितासाठी आग्रही राहून आंदोलन करणार्या निडर कार्यकर्त्यांनाही नव्याने पक्षात संधी द्या, अशा सूचना पक्षाचे सरचिटणीस आ. रोहित पवार यांनी केल्या.
सातारा राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष सुनील माने, नितीन सावंत, सरचिटणीस राजकुमार पाटील, साहिल शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते. आ. रोहित पवार म्हणाले, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने पक्षसंघटना बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. संघटनेच्या वाढीसाठी आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना सर्वांनीच साथ दिली पाहिजे.
पवारसाहेबांच्या विचारांना मानणार्या नवीन कार्यकर्ते, महिला वर्गाला सोबत घेऊन आपण पुढील वाटचाल सुरु ठेवणार आहोत. या वाटचालीमध्ये जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात येणार आहे. विविध सेलच्या निवडी या महिनाअखेरीपर्यंत पूर्ण होतील. जे कार्यकर्ते आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांसाठी व्यवस्थेशी झगडत आहेत, त्यांना पक्षामध्ये नव्याने संधी देण्यात येणार आहे. केवळ बातमीत फोटो यावा, म्हणून पुढे-पुढे करणार्यांना संधी न देता विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलन करणार्यांनाच संधी देण्याबाबत दक्षता पाळावी, असेही आ. रोहित पवार म्हणाले.