

सातारा : सातारा शहर परिसरात सोन्याचे बिस्कीट देतो, अशी भुरळ पाडून वृद्धांना लुबाडणाऱ्या गणेश विनायक गायकवाड (वय 36, रा. भालगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला पोलिसांनी अटक करून बनावट सोन्याचे बिस्कीट व 5 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
साताऱ्यात सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. गेल्या आठवड्यात याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी विविध 25 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमुळे संशयित लातूर, बीड, अहिल्यानगर, पाथर्डी परिसरातील रेकॉर्डवरील संशयित असल्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानुसार सापळा लावला. दि. 18 डिसेंबर रोजी संशयित सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने भालगाव (ता. पाथर्डी) येथे संशयिताला पकडले. त्याने अन्य साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयिताकडून पोलिसांनी बनावट सोन्याची बिस्किटे व 4 लाख 50 हजारांचे सोने जप्त केले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजित भोसले, नीलेश जाधव, सतीश मोरे, सुनील मोहिते, नीलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.