

सातारा : मराठ्यांची चौथी राजधानी असलेल्या सातार्यात शनिवारी पार पडलेल्या शाही दसरा सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विजया दशमीचा हा सीमोल्लंघन सोहळा उत्साहपूर्ण, मंगलमय वातावरणात व अलोट गर्दीत पार पडला. प्रारंभी जलमंदिर येथे भवानी तलवारीस पोलिस विभागाने शासकीय मानवंदना दिली. त्यानंतर जलमंदिर, राजवाडा ते पोवई नाका, शिवतीर्थपर्यंत शाही मिरवणूक निघाली. मिरवणुकीमधील हत्ती, घोडे, उंट, ढोल-ताशा पथक सातारकरांचे विशेष आकर्षण ठरले.
जलमंदिर येथे सुरुवातीला भवानी देवीच्या मंदिरामध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याहस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. यावेळी जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सातारावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलमंदिर येथून सायं. 5 वा. शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये सहभागी हत्ती, उंट, घोड्यांवर बाल मावळे स्वार झाले होते. ढोल-ताशा पथक, हलगी पथक, सनई चौघडे, तुतारी वाद्यांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी सजवलेल्या वाहनात पालखी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये भवानी तलवार ठेवण्यात आली.
जलमंदिर ते पोवई नाका अशी शाही मिरवणूक काढण्यात आली. शाही मिरवणुकीमध्येही अबालवृध्दांसह सातारकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाही थाटातच दसरा सोहळ्याची मिरवणूक शिवतीर्थ येथे दाखल झाली. शिवतीर्थ परिसर विद्युत रोषणाईने नटला होता. शाही दसर्यानिमित्त दोन दिवस शस्त्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, अंबामाता की जय, तुळजाभवानी माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन भवानी तलवारीला शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भवानी तलवारीचे पूजन केले. आरती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा जलमंदिराकडे मिरवणूक मार्गस्थ झाली. दरम्यान, शाही सीमोल्लंघनाचे लाईव्ह प्रक्षेपण विविध सोशल माध्यमांवर दाखवण्यात आले. मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता.
राजघराण्याचा दसरा उत्सव व पारंपरिक वाद्याचा गजर, शिंग, तुतारी, छत्र, चामरे, हत्ती घोड्यांसह निघालेली भवानी तलवारीची शाही मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांनी मिरवणूक मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सातारकर मुख्य रस्त्यावर आले होते. राजवाडा, मोतीचौक परिसर गर्दीने बहरून गेला होता.