

मीना शिंदे
सातारा : संधिवाताचे अनेक प्रकार असून योग्य निदान होणे गरजेचे आहे. बऱ्याचदा स्नायू व सांधेदुखीवर संधिवाताचे उपचार सुरू होतात. रुमॅटॉईल अर्थरायटीस्, गॉटस अर्थरायटीस्मध्ये रक्त गोठल्यामुळे काळे निळे डाग पडतात. हे संधिवात व हिमोफिलिया या दोन्ही आजारांतील साम्य असल्याने उपचारातही फसगत होऊन रुग्णाला नाहक त्रास बळावतो. संधिवाताच्या आडून हिमोफिलियाचा धोका बळावत असल्याने विशेषत: पुरुषांमध्ये सांधे दुखत असल्यास हिमोफिलियाची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. उशिरा निदान हे धोक्याची घंटा ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
शरीरात रक्त गोठण्याची नैसर्गिक प्रक्रिया होण्यासाठी 12 घटक आवश्यक असतात. हे बारा घटक ‘व्हिटॅमिन के’मध्ये असतात. ‘व्हिटॅमिन के’ हा शरीराला रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांचा एक समूह आहे, ज्यामुळे जखमा बऱ्या होण्यास मदत होते. यामध्ये बारा घटकांचा समावेश आहे. त्यापैकी आठ व नऊ या घटकांची कमतरता असल्यास हिमोफिलियाचा आजार उद्भवतो. महिलांच्या तुलनेत कोणत्याही वयोगटातील पुरुषांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे.
आजारासाठी अनुवंशिकता हेदेखील एक कारण आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे. रुमॅटिक अर्थरायटिस, गॉटस् अर्थरायटीस या संधिवाताच्या प्रकारात व हिमोफिलियाच्या लक्षणांमध्ये साम्य आहे. रक्ताची गुठळी होऊन सांध्यांवर साचते व काळे निळे डाग दिसतात. त्यामुळेच अनेक रुग्णांमध्ये संधिवाताचे उपचार केले जातात. त्यामुळे आजारावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा परिस्थिती आणखी गंभीर होते. आजार पूर्ण बरा होत नसला तरी त्यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते. परिणामी, उशिरा निदान म्हणजे धोक्याची घंटा ठरत आहे. संधिवाताची लक्षणे जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला व योग्य उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.